प्रसूतिवेदनेने अस्वस्थ झालेल्या पारधी समाजातील महिलेच्या मदतीला पोलीस
लोणावळा – “साहेब, लक्ष्मी आली घरा, तुम्ही मामा झालात. पुजाने आत्ताच पोरीला जन्म दिलाय, बाळ आणि बाळंतीण सुखरूप आहेत’. हे शब्द होते एक नवजात मुलीच्या आजीचे. पाणावलेल्या डोळ्यांनी, अत्यंत गहिवरलेल्या स्वरात ही महिला फोनवर बोलत होती, आणि समोरील व्यक्तींचे आभार मानत होती. ती ज्या व्यक्तींचे आभार मनात होती, त्या व्यक्ती होत्या लोणावळा शहर पोलीस कर्मचारी.
करोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाचे सावट सध्या सर्वत्र आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून लोणावळा नगरपरिषदेने तात्पुरत्या स्वरूपात काही शल्टर हाऊसची व्यवस्था केली आहे. अशाच एका शल्टर हाऊसमध्ये निवऱ्याला असलेल्या पारधी समाजातील एका नऊ महिन्याच्या गरोदर महिलेला सोमवारी मध्यरात्री अचानक प्रसूति वेदना सुरू झाल्याने ती अस्वस्थ झाली. अशा अवघड परिस्थितीत सापडलेल्या या महिलेला आणि तिच्या हतबल आई-वडिलांना लोणावळा शहर पोलिसांनी देवदूतासारखी मदत केली. पोलिसांनी वेळीच धावपळ केल्याने या महिलेने सुखरूपपणे तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला.
लोणावळा शहरातील इंद्रायणी पुलाजवळील कन्या शाळेत सुरू केलेल्या “शल्टर हाऊस’मध्ये लोणावळा नगरपालिकेने पारधी समाजातील 60 ते 65 लोक ठेवलेले आहे. त्यात पूजा दीपक पवार (वय 25) नावाची महिला 9 महिन्यांची गरोदर होती. सोमवारी पहाटे 2 वाजता पूजा हिच्या पोटात अचानक दुखू लागले आणि तिला प्रसूति कळा सुरू झाल्या. क्वारंटाइन केंद्र असल्याने त्याठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या कर्मचारी पोलीस कॉन्सटेबल सचिन रामदास खुळे यांनी तातडीने ही बाब लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये कळवली. त्यावेळी ड्युटीवर असलेले ठाणे अंमलदार पोलीस नाईक किरण नांगरे यांनी तातडीने एकीकडे रुग्णवाहिकेसाठी फोन करून दुसरीकडे भांगरवाडी परिसरात रात्र गस्तीसाठी असलेले पोलीस नाईक वैभव सुरवसे यांना फोनद्वारे परिस्थितीची माहिती दिली.
माहिती समजताच जराही वेळ न दडवता पोलीस नाईक सुरवसे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान रुग्णवाहिका येण्यास उशीर होत असल्याचे व पूजा हिस प्रसूति वेदना असहाय्य होत असल्याचे पाहून, पोलीस नाईक सुरवसे यांनी तात्काळ तिथे असलेल्या महिलांच्या मदतीने पूजा हिस तिचे आई वडिलांसह स्वतःच्या मोटारीमध्ये बसवून लोणावळा येथील परमार हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले.
परमार हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी पूजा हिस स्त्री रोग तज्ज्ञ यांचेकडे घेऊन जाणेचा सल्ला दिला. दरम्यानचे काळात रुग्णवाहिका देखील परमार हॉस्पिटल येथे दाखल झाली. पोलीस नाईक मनोज यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरवसे यांनी पोलीस कॉस्टेबल शंकर धनगर यांना मदतीला देत तात्काळ पूजा हिला, तिचे वडील संतोष पवार व आई जनाबाई पवार यांचेसह रुग्णवाहिकेमधून प्राथमिक आरोग्य केंद्र, कार्ला येथे रवाना केले.
मात्र त्याठिकाणी आवश्यक साधन सामग्री उपलब्ध नसल्याने डॉ. पोळ यांच्याशी संपर्क साधून शंकर धनगर यांनी पूजा हिला 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेमधून तळेगाव जनरल हॉस्पिटल नेऊन दाखल केले, आणि तेथून लोणावळा शहर पोलीस स्टेशनला परतले. सकाळी आठ वाजता पूजाच्या आईने पोलीस कॉन्टेबल शंकर धनगर यांना फोन केला आणि रडत रडत सांगितले की साहेब, लक्ष्मी आली घरा. तुम्ही मामा झाले’, या सुखद बातमीने लोणावळा पोलीस दलातही उत्साह संचारला.