शिरूर-शिरूर शहर सर्व पंचक्रोशीला वादळी वारा व पावसाने झोडपले. यामुळे शेतकरी आणि नागरिक समाधानी असले तरी आणखी पाऊस व्हावा, अशी सर्वांची इच्छा आहे. मुसळधार पावसामुळे वातावरणामध्ये चांगलाच गारवा पसरला होता. हा पाऊस थोडे समाधान देणारा व पुढील काळात दिलासा देणारा ठरेल. लहान मुलांनी या पल्यिा पावसात भिजून आनंद घेतला.
गेल्यावर्षी शिरूर तालुक्यात मान्सूनच्या पावसाने ओढ दिली होती. तर संपूर्ण पावसाळ्यामध्ये शिरूर तालुका पंचक्रोशीला व शिरूर शहरात म्हणावा असा पाऊस पडला नव्हता. यंदा पहिल्याच आठवड्यात सात जूनला शिरूरला पावसाने हजेरी लावली. पाऊस म्हणावा असा झाला नसला तरी नागरिक आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारा नक्कीच होता. गेल्या अनेक दिवसांपासून वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता वाढली होती. मागच्या वर्षीच्या अनुभवानुसार पाऊस होईल का नाही किंवा जून महिन्यात पाऊस पडेल का नाही, ही शंका सगळ्यांना होती.
आज सायंकाळी पाचच्या सुमारास वादळाने कहर केला. संपूर्ण आकाश धुळीने माखले गेले. वादळामुळे मोठ्या प्रमाणात झाडे हलत होती. ठिकठिकाणी झाडाची वाळलेल्या फांद्या व विजेच्या तारा तुटून पडल्या. आकाशामध्ये म्हणावे असे ढग नसतानाही वादळ पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत होते. शिरूरमध्ये जवळपास अर्धा ते पाऊण तास मुसळधार पाऊस पडला. पावसामुळे थोड्या फार प्रमाणात जमिनीवर आणि वातावरणात थंडावा पडला. आजचा पाऊस समाधान देणारा नसला तरी पुढील काळात दिलासा देणारा नक्कीच होता. असे अजून तीन चार पाऊस झाले तर मूग आणि कडधान्य पेरणीसाठी उपयुक्त ठरणार आहे.