पाबळ येथील धोकादायक झाड हटविण्याची मागणी
पाबळ-येथील बाजारतळावरील अजस्त्र वडाचे झाड कोणत्याही वादळ वाऱ्याविना व कोणतीही दुर्घटना न होता कोसळून पडल्याचे घटनेला तीन आठवडे उलटले; मात्र उर्वरित धोकादायक झाडे पडण्याबाबत कोणतीही हालचाल दिसून येत नसल्याने ग्रामस्थांमधून भीतीदायक आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दुर्घटना घडल्यावरच वनखात्याला जाग येणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
दरम्यान या बाजारतलावर अजून अनेक झाडे धोकादायक असल्याचा पंचनामाही वनखात्याकडून करण्यात आला होता. तर इतर धोकादायक झाडे पाडण्यासाठी वरिष्ठांना अहवाल सादर केल्यानंतर उर्वरित धोकादायक झाडे पाडण्यास परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती वनखात्याकडून देण्यात आली होती. मात्र तब्बल महिना होऊनही हालचाल होत नसल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत. दरम्यान पाबळ गावठाणात अजूनही काही जीर्ण व जुनी झाडे असून त्या झाडांपासूनही धोका असल्याची माहिती ग्रामस्थ देत असून प्रसिद्ध जैन मंदिर धर्मशाळेजवल आजही उंबराचे एक झाड केव्हाही उन्मळून पडू शकते, अशी येथील नागरिकांची तक्रार आहे. याठिकाणी दर रविवार, गुरुवार व इतर सणावाराला नियमित हजारोंच्या संख्येने जैन भाविकांची ये-जा सुरू असते.
दरम्यान बाजार तळावर आठवडे बाजार नसताना णाड कोसळल्याची घटना घडली होती. त्यामुळे कोणतीही हानी झाली नव्हती व तेथील पडलेले झाडही हलवण्यात आले असल्याने ही घटना तूर्त विस्मृतीत गेली असल्याने धोक्याची टांगती तलवार मात्र आठवडे बाजार दिवशी कायम असल्याने उर्वरित झाडे त्वरित पाडणे गरजेचे आहे. याठिकाणी शाळा कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर ये जा करत असल्याने घटनेची तीव्रता कायम आहे.
- याबाबत पंचनामा व अहवाल देण्यात आला आहे; परंतु ग्रामपंचायतकडून ग्रामसभेचा ठराव व मिळकतीचे कागद मिळाले नाहीत. त्यामुळे परवानगी रखडली आहे.
-चारुशिला काटे, वनपाल - दोन दिवसांपूर्वीच अशी मागणी करण्यात आली होती तरीही कागदपत्रे पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
-संतोष जाधव, उपसरपंच पाबळ - येथील झाडातून वीजवाहक ताराही गेल्या आहेत. त्यांचे घर्षणही सतत सुरू असते. यासाठी हे झाड त्वरित हलवण्यात येणे गरजेचे आहे. याठिकाणी मोठ्या संख्येने जैन यात्रेकरू ये-जा करतात.
-प्रदीप गुजर/सतीश जगताप, व्यावसायिक