मुंबई – गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना करोनाची लागण झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती उषा मंगेशकर यांनी दिली आहे. उषा मंगेशकर म्हणाल्या, दीदींची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे. त्या लोकांसोबत बोलू शकतात. पण डॉक्टरांनी त्यांना बोलणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.
मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयातील डॉ. प्रतित समदानी आणि त्यांची टीम लता दीदींवर उपचार करत आहेत. ब्रीच कॅंडी रुग्णालयाचे डॉ. प्रतित समदानी म्हणाले, लता मंगेशकर सध्या आयसीयूमध्ये असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
सध्या त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे. पण अद्याप त्या आयसीयूमध्येच असल्याचे त्यांनी सांगितले आहे. लता मंगेशकर याची प्रकृती कशी आहे, याबाबत त्यांची भाची रचना शहा यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
माध्यमांशी बोलतांना त्या म्हणाल्या,“लता मंगेशकर यांना शनिवारी ८ जानेवरीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना करोनाची सौम्य लक्षण जाणवत होती. सध्या त्या उपचारांना उत्तम प्रतिसाद देत आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. यामुळे आम्ही आनंदी आहोत. चाहत्यांनी केलेल्या प्रार्थनामुळे लता मंगेशकरांची प्रकृती सुधारत आहे. पण यासोबतच आमची काही गोपनीयताही लक्षात ठेवा.”
खबरदारी म्हणून लता मंगेशकर यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असले तरी त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांना पुढील 7 ते 8 दिवस रुग्णालयातच राहावे लागणार आहे. लता मंगेशकर यांना कोविड न्युमोनिया झाला आहे.