इंदौर – लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या स्थलांतरित मजुरांनी उत्तर प्रदेशातील लखनौला परत जाण्यासाठी चक्क सिमेंटच्या मिक्सरमधून प्रवास करण्याचा धोकादायक पर्याय निवडल्याचे नुकतेच उघड झाले आहे. मध्य प्रदेशातल्या महामार्गावर हा सिमेंटचा मिक्सर पकडण्यात आल्यावर ही धक्कादायक बाब उघड झाली.
उज्जैन आणि इंदौरदरम्यानच्या पोलीस अधिकाऱ्यांनी संशयावरून हा मिक्सर अडवला आणि तपासल्यावर हा प्रकार उघड झाला. लॉकडाऊन दरम्यान माणसांची अवैध वाहतूक करण्याबद्दल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चालकाचे वर्तन संशयास्पद वाटल्यामुळे पोलिसांनी या मिक्सरची कसून तपासणी केली. या मिक्सरच्या ड्रममध्ये तब्बल 18 माणसे दाटीवाटीने बसल्याचे आढळून आले. या मिक्सरच्या ड्रमचे तोंड जेमतेम एका व्यक्तीला आत जाता येईल, इतके लहान आहे. ड्रमचा आकार पाहता त्यात 2-3 व्यक्ती बसू शकतील, एवढीच जागा असू शकते. मात्र, यामध्ये दाटीवाटीने बसून तब्बल 18 जणांनी हा प्रवास करण्याचा धोका पत्करला होता.
रस्त्याच्या कडेला मिक्सर उभा करून ड्रममधील माणसांना एक – एक करून बाहेर काढले गेले. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या सर्व प्रवाशांना विलगीकरणासाठी पाठवून दिले गेले आहे. तिथे त्यांची तपासणी केली जाणार आहे. तर मिक्सर पोलीस स्टेशनला पाठवून दिला गेला आहे.
गेल्या आठवड्यात हरियाणातून बिहारला जाण्यासाठी एका ट्रकमध्ये दाटीवाटीने बसलेल्या 94 जणांना पोलिसांनी असेच ताब्यात घेतले होते.