दौंड तालुक्यातील पश्चिम पट्यात निर्माण झालेली स्थिती
नांदूर – दौंड तालुक्यातील पश्चिम पट्यातील मुळा मुठा नदीलगतच्या गावामध्ये पाणी शिरले असून दहिटणे येथील पुल पाण्याखाली गेला आहे. गावामध्ये पूराचे पाणी आल्याने काही ठिकाणी वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे. आज, सकाळी गावकामगार तलाठी किशोर परदेशी व पोलीस पाटील नेहा प्रविण बोराटे यांनी गावातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरूवात केली.
मुळा मुठा नदीला पूर आला असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे नदी लगतच्या गावांमध्ये अनेक भागात पाणी शिरल्याने गावात दाणादाण उडाली असून पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. मुळा मुठानदीच्या पाणीपातळीत वाढ होत सुरूच आहे. धरणक्षेत्रासह अनेक ठिकाणी संततधार सुरू आहे. मुळा मुठा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागले आहे. नदीलगतच्या गावांना पूराचा धोका निर्माण झाला असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
मिरवडी, दहिटणे, नांदूर, खामगाव गावांना काही ठिकाणी पूरच्या पाण्याने वेढा दिला आहे. गावातील मंदिर, स्मशानभूमी यासह छोटे-मोठे रस्ते, बंधारे पाण्याखाली गेले आहेत. या परिसराची पाहणी गटविकास अधिकारी कोकरे तसेच उमेश म्हेत्रे, शमुद्दीन शेख, प्रविण बोराटे, दिपक थोरात, किसन थोरात आदींनी केली असून सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाय योजनांची तयारी करण्यात आली आहे.
- “प्रभात’वृत्ताची तासभरातच दखल…
खामगाव, नांदुर, मिरवडी, दहिटणे या नदीकाठच्या गावांना महापुराचा धोका तसेच पुल पाण्याखाली गेल्याबाबतचे वृत्तांकनाचा व्हिडीओ “प्रभात डिजिटल’वर झळकल्यानंतर ग्रामपंचायतीसह तालुका प्रशासनाचीही पळापळ झाली. अवघ्या तासाभरात शासकीय अधिकारी गावात हजर झाले. संबंधीत अधिकाऱ्यांनी गाव परिसराची पाहणी करून सरपंच, पोलीस पाटील यांच्यासह ग्रामसुरक्षा दलाला सुचना केल्या. - नांदुर परिसरात सकाळपासून सुरक्षितता वाढविली असून ग्रामसुरक्षा दल आमच्या बरोबर कार्यरत आहे. मोठी आपत्ती आल्यास आणखी मदत मागविण्याची तयारी ठेवली आहे.– नेहा बोराटे, पोलीस पाटील, नांदूर
- गावात 1997 मध्ये गावात महापूर आला होता, त्यानंतर अशी स्थिती निर्माण झाली आहे. गावात पुराचे पाणी आले आहे. ग्रामप्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून याबाबतचा आढावा संबंधीत अधिकाऱ्यांना सातत्याने दिला जात आहे.
– लता थोरात, सरपंच, नांदूर