पुणे : पावसाचा जोर कायम, उद्या देखील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

पुणे – शहरासह ग्रामीण भागात पावसाचा जोर आजही कायम राहिल्याने जिल्ह्यातील पूरपरिस्थिती कायम आहे. येत्या दोन दिवसात देखील अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसेच मुसळधार पावसाने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील पाणीसाठ्याने गतवर्षीची पाणी पातळी ओलांडली आहे. त्यामुळे धरणातून सतत पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने अनेक नद्यांना पूर आल्याने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

त्यामुळे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपात्कालिन परिस्थिती निर्माण झाली असल्याने त्याचा परिणाम शालेय विद्यार्थी यांना होऊ नये याकरीता खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी उद्या देखील (6 ऑगस्ट, मंगळवारी) सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयांना  सुट्टी जाहीर केली आहे. सोमवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी यांनी ही माहिती दिली.

दरम्यान, कालच पुणे जिल्ह्यातील शाळांना आज (5 ऑगस्ट, सोमवारी ) अतिवृष्टीमुळे सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र पावसाचा जोर अद्याप कायम असल्याने सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या देखील (6 ऑगस्ट, मंगळवारी) सुट्टी देण्याचा निर्णय जिल्हाअधिकाऱ्यांनी घेतला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.