- कायदेशीर कारवाईची ज्यूनिअर इंजिनिअर्स असोसिएशनची मागणी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांनी महिला कनिष्ठ अभियंत्यांना खासगी कार्यालयात बोलावून घेऊन असभ्य भाषेत शिवीगाळ केली तसेच धमकी दिली आहे. स्थापत्य विषयक कामावरुन अरेरावीची भाषे वापरल्याचा आरोप करत नगरसेवक शेख यांच्यावर कादेशीर कारवाईची मागणी पिंपरी-चिंचवड महापालिका ज्यूनिअर इंजिनिअर्स असोसिएशनने केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात इंजिनिअर्स असोसिएशनने म्हटले आहे की, महिला कनिष्ठ अभियंता पल्लवी सासे, अनिल काशिद यांना प्रभाग क्रमांक चौदाचे नगरसेवक जावेद शेख यांनी सोमवारी (दि.16) सकाळी त्यांच्या खासगी कार्यालयात बोलावून घेतले. प्रभागामध्ये चालू असलेल्या स्थापत्य विषयक विकासकामांबाबत विचारणा केली. अरेरावीच्या भाषेत कार्यालयात उपस्थित असलेल्या नागरिकांसमोर असभ्य भाषेत शिवीगाळ केली. शहराच्या प्रथम नागरिक महिला असूनही देखील नगरसेवकांकडून महिला अधिकाऱ्यांना अशा प्रकारची वागणूक देणे लाजीरवाणी घटना आहे.
मागीलवर्षी देखील पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता सुशील लवटे यांच्या चेहऱ्यास शेख यांनी काळे फासून “व्हिडीओ क्लिप’ सोशल मीडियावर शेअर केली होती. शेख यांच्याकडून अशा घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी प्रशासनामार्फत त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. नगरसेवकांनी अभियंत्यांना कार्यालयामध्ये बोलावून अशा प्रकारे वागणूक देणे, शिवीगाळ, माहराहण, मानसिक छळ करणे अंत्यत चुकीचे आहे. कर्मचारी, अधिकाऱ्यांना नगरसेवकांनी खासगी कार्यालयात, निवासस्थानी बोलावू नये. त्याबाबत प्रशासनाने आदेश निर्गमित करण्याची मागणीही त्यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
केवळ मोठ्या आवाजात बोललो – शेख
याबाबत नगरसेवक जावेद शेख म्हणाले, “महिला कनिष्ठ अभियंत्याना शिवीगाळ केलेली नाही. त्यांनी पुरावा दाखवावा. त्यांना कामाचा कंटाळा आहे. खड्डे बुजविले जात नाहीत, मनमानी पद्धतीने काम करतात. महापालिकेच्या पैशांचा अपव्यय करत आहेत. नागरिकांसाठी आमची तळमळ असून रागाच्या भरात मोठ्या आवाजात बोललो असेल. परंतु, शिवीगाळ केली नाही.