नवी दिल्ली – ऑगस्ट महिन्यात जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील बेंगालड परिसरात सापडलेल्या भुयारानंतर आता सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना जम्मू-काश्मीरमधील हीरानगर सेक्टरमधील पानसर येथे एक भुयार आढळून आले आहे. या भुयाराची लांबी 150 मीटर लांब असून, दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी पाकिस्तानी गुप्तचर विभागाकडून या बोगद्याची निर्मिती करण्यात आली होती.
गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरू असलेल्या विशेष शोधमोहीमेत जम्मूमधीप पानसर येथे आणखी एक बोगदा आढळला आहे. बीएसएफने जून 2020 मध्ये याच भागात शस्त्र आणि स्फोटकं घेऊन जाणारे एक पाकिस्तानी हेक्साकॉप्टरला पाडले होते. जवानांनी नोव्हेंबर 2019 मध्ये याच क्षेत्रातील घुसखोरीचा प्रयत्न देखील हाणून पाडला होता.
लष्करी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, आतापर्यंत जम्मू परिसरात दहाव्यांदा आणि मागील सहा महिन्यांमध्ये चौथ्यांदा बोगदा आढळून आला आहे.