- यंदाही पब्जीच्या पिचकाऱ्यांना मागणी
- “करोना’मुळे स्वदेशी पिचकाऱ्यांना “अच्छे दिन’
पिंपरी – होळीचा सण तोंडावर येउन ठेपला असून होळीसाठी लागणाऱ्या साहित्याने पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारपेठ सजू लागल्या आहेत. खासकरुन होळींनंतर येणाऱ्या रंगपंचमी-धुळवडसाठी शहरात विशेष तयारी सुरु आहे. पिचकारी व रंगांनी बाजारपेठा सजल्याचे चित्र दिसत आहे. बाजारात विविध प्रकारच्या पिचकाऱ्या विक्रीस आल्या असून बालचमूंकडून पब्जीच्या पिचकारीला विशेष मागणी होत आहे. करोनामुळे चिनी पिचकारी बाजारातून गायब झाली असून देशी बनावटीच्या “दिल्ली मेड पिचकारी’ला चांगले दिवस आले आहेत.
होळी निमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून लहान मुलांना मात्र रंगपंचमीचे- धुळवडीचे वेध लागले आहेत. मुलांना पिचकारीचे अधिक आकर्षण असल्यामुळे पिंपरी कॅम्प परिसरासह शहरातील विविध भागात रंगीबिरंगी आकर्षक अशा पिचकाऱ्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. प्रत्येक भारतीय सणाला चीनी वस्तू बाजारांवर कब्जा करतात. “करोना’चा प्रभाव भारतीय सणांवर पडला असून करोनामुळे चिनी पिचकारीची आयात झाली नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. होळी व रंगपंचमीचा रंग बाजारावर सजू लागला असून शहरात होळी सणानिमित्त उत्साहाचे वातावरण आहे.
किंमतीत 30 ते 40 टक्के वाढ
पिंपरी चिंचवड शहरातील बाजारपेठांमधे होळी रंगपंचमीच्या काळात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. परंतु यंदा मागील वर्षीच्याच उरलेल्या चिनी पिचकारीला काही ग्राहकांकडून मागणी होत असून किंमतीत 30 ते 40 टक्के वाढ झाली आहे. सध्या स्पायडर मॅन, सर्जिकल स्ट्राईक गन, तसेच दिल्ली मेड पिचकारीची बाजारात चलती दिसत आहे. पब्जी पिचकारी 180 रुपयांपासून 500 ते 600 रुपये, युनिकोन 300 ते 400रुपये, गुजराती ड्रम 200 ते 500 रुपये छत्री व मछलीवाली पिचकारी अनुक्रमे 150 ते 50 रुपयांपासून उपलब्ध आहेत. कलर स्प्रे, हर्बल गुलाल, हर्बल लिक्विड, मॅजिक कलर, कॅप्सूल यांसारखे प्रकार बाजारात विक्रीस उपलब्ध झाले असून नैसर्गिक व इको फ्रेंडली रंगांना अधिक मागणी होत आहे, अशी माहिती विक्रेते सोमेश दळवे यांनी दिली.
सोशल मीडियावरही “धुळवड’
“करोना’च्या धास्तीमुळे रंगांच्या वापराबाबतच आता सोशल मीडियावर अफवांची धुळवड जोरदार सुरु आहे. होळीचे रंग, फुगे सर्व चीनमधूनच आयात करण्यात येतात. त्यामुळे “करोना’ व्हायरसची लागण होऊ शकते, अशा अफवा सोशल मीडियावर सुरु आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे नाव वापरुन ही पोस्ट व्हायरल होत आहे. तसेच पाण्याचा अपव्यय करु नका, अशा पोस्ट्स फिरु लागल्या आहेत. परंतु यावर्षी या पोस्ट्सना उत्तर देणाऱ्या पोस्ट्सही सोशल मीडियावर तयार आहेत. त्यात प्रामुख्याने पाण्याची बचतच करायची असेल, तर 364 दिवस करा, पण सण साजरे करण्याचे सोडू नका. अशा पोस्टही फिरत आहे. एखाद्या पर्यावरणप्रेमीने पाणी वाचविण्याची पोस्ट टाकल्यास कमेंटमध्ये बाथरुममधील शॉवर आणि टॉयलेटमधील फ्लॅश काढण्याचा सल्ला पोस्ट टाकणाऱ्यांना काही नेटकरी देत आहेत.