नवी दिल्ली – दिल्लीतील दंगल हा सुनियोजित वंशविच्छेदाचा प्रकार आहे असा आरोप करीत तृणमुल कॉंग्रेस पक्षाने या दंगलीग्रस्तांसाठी स्वतंत्र निधी उभारणीची घोषणा केली आहे. पक्षाचे खासदार डेरेक ओबरिएन यांनी सांगितले की, या निधीसाठी दहा लाख रूपयांची मदत या आधीच घोषित झाली आहे.
आज येथे पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, दिल्लीची दंगल हा वंशविच्छेदाचाच प्रकार होता. तो सुनियोजितपणे करण्यात आला आहे. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखेखाली चौकशी होण्याची गरज आहे.
सरकारने दिल्ली दंगलींविषयी संसदेत चर्चाच होऊ दिलेली नाही. हे आम्हाला पुर्ण अमान्य आहे असे ते म्हणाले. या हत्यांच्या बाबतीत सरकार उत्तरे देण्याचे टाळत आहे. ते म्हणाले की आमच्या पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी दंगलग्रस्तांच्या मदतीसाठी एक स्वतंत्र निधी उभारण्याची घोषणा केली आहे.
यासाठी स्वता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पाच लाख रूपयांची मदत घोषित केली असून पक्षाचे खासदारही प्रत्येकी दहा हजार रूपये यासाठी देणार आहेत. सरकारचे हात रक्ताने माखलेले आहेत, त्यांनी संसदेत येऊन आमच्या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत असे ते म्हणाले.