गोतोंडी रस्त्याचे काम निकृष्ट : पदाधिकाऱ्यांच्या मागणीला हरताळ
निमसाखर- इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील अनेक गावाच्या दळणवळणाच्यादृष्टीने महत्त्वाचा असलेल्या व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 5 कोटी 30 लाखाचा निधी मंजूर होऊन सुरु झालेल्या गोतोंडी- घोरपडवाडी ते दगडवाडी रस्ताचे कामकाज सध्या निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचा आरोप गोतोंडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच धनंजय मोटे यांसह स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांनी केला आहे.
यावेळी उपसरपंच धनंजय मोटे व नागरिकांना दिलेल्या माहितीनुसार, गोतोंडी- घोरपडवाडी ते दगडवाडी 7 किलोमीटर अंतरासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 5 कोटी 30 लाखांचा निधी उपलब्ध होऊन कामाला सुरुवात झाली आहे. परंतु या रस्त्याच्या कामात संबंधित ठेकेदाराकडून अल्प प्रमाणात खडी व मुरूमाचा वापर केला जात आहे.इस्टीमेटप्रमाणे कामकाज होत नाही. यासंदर्भात अनेकदा सूचना करूनही ठेकेदाराने दुर्लक्ष केले आहे. तसेच काम निकृष्टपणे सुरू ठेवले आहे.
कोट्यवधींचा निधी उपलब्ध असून देखील संबंधित रस्ताचे कामकाज पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे होत असताना देखील संबंधित विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. केवळ अधिकारी व ठेकेदार यांचे आर्थिक लागेसंबंध असल्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या कामात मोठा भ्रष्टाचार होत आहे. संबंधित अधिकारी यांनी पाहणी करून या रस्त्याचे कामकाज दर्जेदार करण्यासाठी संबंधित ठेकेदार यांना सूचना कराव्यात; अन्यथा रस्त्याचे कामकाज बंद पडण्याचा इशारा उपसरपंच धनंजय मोटे व शेतकरी, नागरिकांना दिला आहे. यावेळी सोसायटीचे माजी अध्यक्ष अशोक कदम, सतीश लोहकरे, सदाशिव कदम, अक्षय शेटे उपस्थित होते. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे इंदापूर विभागाचे शाखाप्रमुख एस. एस. बोधे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु भ्रमणध्वनी बंद असल्यामुळे त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.