भाजपचा आंदोलन छेडणार : आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
पळसदेव- पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पळसदेव येथे गटारीवर झाकण नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. पळसदेव येथे बस थांब्याजवळ असलेल्या गटारीवर झाकण बसवण्यात आले नाही. त्यामुळे या ठिकाणी दररोज बसची वाट असलेल्या विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उघड्या गटारीमुळे गावात साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे. गटारीवर झाकण बसवण्यासाठी अनेकदा निवेदन देण्यात आले होते. मात्र, यावर अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. पळसदेव ग्रामपंचायतीच्या वतीने महामार्ग प्राधिकरणाशी पत्रव्यवहार करून कळवले होते. तरीही हायवे प्राधिकरणाच्या वतीने जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करण्यात येत आहे. उघड्या गटारीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गटारीवर झाकण बसवण्यात यावे, या मागणीसाठी पळसदेव भाजपच्या वतीने तहसीलदार सोनाली मेटकरी यांना निवेदन देण्यात आले आहे.
तातडीने यावर उपाययोजना न केल्यास पळसदेव येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे किरण काळे यांनी एका लेखी निवेदनाद्वारे संघितले. यावेळी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य माऊली चवरे, इंदापूर शहराध्यक्ष माऊली वाघमोडे, चॉंद पठाण, दक्षता समिती सदस्य मेहबूब मोमीन, युवा नेते अमोल देवकाते, पळसदेव गणप्रमुख किरण काळे, भाजपा युवा मोर्चाचे इंदापूर तालुकाध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.