दुबई – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची जागा कोणीही घेऊ शकत नाही. त्याच्या जागी यष्टीरक्षण व फलंदाजी करण्यासाठी अनेक खेळाडू पुढे येतील. मात्र, जो दर्जा धोनीने सिद्ध केला त्याची तुलनाच होऊ शकत नाही, अशा शब्दांत लोकेश राहुलने आपल्या भावना व्यक्त केल्या.
पत्रकारांच्या एका गटाशी झूम कॉलवरून संवाद साधताना राहुलने धोनीच्या जागी आपली निवड झाल्याने नाकारले. धोनीने विश्रांती घेतल्याने संघ व्यवस्थापनाने मला संधी दिली. केवळ फलंदाजीची नव्हे तर काही सामन्यात यष्टीरक्षणही केले. मात्र, त्यामुळे मी धोनीची जागा घेतली असे म्हणता येणार नाही. धोनीसारखे खेळाडू शतकात एखाद्यावेळी गवसतात. धोनी एकमेवाद्वितीय आहे व राहणार, असेही राहुलने सांगितले.
सध्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला धोनीसारख्या अव्वल खेळाडूची नितांत गरज आहे. मात्र, त्याचा सर्वोत्तम पर्याय मिळेल असे नाही. संघासाठी यष्टीरक्षण व फलंदाजी करण्यासाठी अनेक खेळाडूंना संधी दिली जाईल, पण धोनीचा वारसदार मिळणे कठीण आहे. त्याचे नेतृत्व, त्याची विचार करण्याची क्षमता, यष्टीरक्षण, फिनीशर म्हणून नावाजलेली फलंदजी अन्य कोणाला जमेल असे वाटतच नाही. संपूर्ण सामन्याचा निकाल एकहाती फिरवणे ही त्याची क्षमता होती. असे खेळाडू वारंवार मिळत नाहीत, असेही राहुल म्हणाला,