“सोशल मिडीया’वर घटनेची जोरात चर्चा
पुणे, दि. 8 – वाहतूक शाखेकडून “डिझायनर’ नंबरप्लेटवर कारवाई करण्याचे प्रकार नवीन नाहीत. मात्र वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्यानंतर “नंबरप्लेट’ बदललेल्या घटनेची चर्चा सध्या “सोशल मिडीया’वर सुरू आहे.
“दादा’, “मामा’, “बाबा’, “पाटील’, “ताई’ आदीसह वेगवेगळ्या आकारांतील “नंबरप्लेट’ वाहनचालकांकडून बसवण्यात येते. मात्र या नंबरप्लेटला कायद्याने बंदी असल्याने पोलिसांकडून दंड आकारण्यात येतो. याच प्रकारे नंबरप्लेटवर “साई’ लिहल्याचे वाहतूक पोलिसांना आढळल्यानंतर, संबंधित वाहनचालकाला दंड आकारत नंबरप्लेट बदलण्यात आली. यानंतर संबंधिताबरोबरचा फोटो थेट वाहतूक शाखेच्या ट्वीटर खात्यावरून “अपलोड’ करण्यात आला. याबाबत “नेटीझन्स’ने वाहतूक पोलिसांच्या या “ऍक्शन’ला दाद दिली.
एका युझरने “साई’ हा शब्द असणाऱ्या “नंबरप्लेट’चा फोटो “ट्वीट’ करत, वाहतूक पोलिसांच्या कारवाईबाबत लिहीले होते. वाहतूक विभागाकडून या वाहनावर तातडीने दंड आकारण्यात आला होता. या ट्वीटचा आधार घेत, पिंपरी चिंचवड परिसरातील संबंधित वाहनचालकाला वाहतूक शाखेने संपर्क साधला, अशी माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली.
दंड केल्यानंतर प्रश्न सुटतो, अशी प्रथा पडत आहे. गाडीवर नंबरप्लेट लावण्याची नियमावली ठरली असून, त्याचे उल्लंघन झाल्यास दंड आकारण्यात येतो. संबंधित चालकाला नियमांनुसार नंबरप्लेट लावण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत दुसरी नंबरप्लेट बसवली, असे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांनी सांगितले.