अकोला : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी जलसंधारण मंत्री बाबासाहेब धाबेकर यांचे आज मुंबईत उपचारादरम्यान निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून आजारी असलेल्या धाबेकरांवर मुंबईत एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. आज सकाळी 11.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेब धाबेकरांचे मूळ नाव केशवराव नारायण गालट असे होते. मात्र, अकोला जिल्ह्यातील धाबा गावच्या या सुपुत्राला राज्याच्या राजकारणात “बाबासाहेब धाबेकर’ या नावाने ओळखले जात होते.
धाबा ग्रामपंचायत सदस्य पदापासून त्यांनी राजकीय कारकीर्द सुरु केली. उपसरपंच, सरपंच, बार्शीटाकळी पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, जि.प. सभापतीनंतर अध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. ते तब्बल 12 वर्षे अकोला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते.
कॉंग्रेसच्या तिकीटावर 1985 मध्ये ते कारंजा मतदारसंघातून विजयी झाले. 1995 मध्ये कारंजातून अपक्ष म्हणून विजयी झालेल्या बाबासाहेबांच्या नेतृत्वात अपक्ष आमदारांनी तेव्हाच्या युती सरकारला पाठिंबा दिला. बाबासाहेब तेव्हा मनोहर जोशींच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री झाले. 1999 मध्ये कारंजातून ते कॉंग्रेसच्या तिकीटावर विजयी झालेत. पुढे विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये बाबासाहेब यांनी ग्रामविकास आणि जलसंधारण खात्याचे कॅबिनेट मंत्रीपद मिळविले. दरम्यान, उद्या (6 नोव्हेंबर) दुपारी बारा वाजता धाबा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.