LPG Price Hike : ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये एलपीजीच्या दरात वाढ करण्यात आली होती. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (Commercial Gas Cylinders) दरात 103 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. कमर्शिअल गॅसच्या किमती वाढल्यामुळे रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थ, मिठाई आणि इतर गोष्टींच्या किमती वाढू शकतात. त्यामुळे काही प्रमाणात याची झळ सर्वसामान्य नागरिकांना देखील बसण्याची शक्यता आहे. परंतु घरगुती सिलेंडरच्या किमतींत कोणाताही बदल करण्यात आला नसल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
गेल्या 32 दिवसांत कमर्शिअल गॅसच्या किमतीत सुमारे 310 रुपयांनी वाढ झाली आहे. मागील महिन्यात तेल कंपन्यांकडून एलपीजीच्या 19 किलोंच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या (cylinder) किमतीमध्ये ही वाढ करण्यात आली होती. व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 209 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. तर सप्टेंबरमध्ये 157 रुपयांनी स्वस्त करण्यात आलेले सिलिंडरचे दर ऑक्टोबरमध्ये त्याच्यापेक्षाही जास्त किंमतीत वाढवण्यात आले होते.
आता मुंबईत कमर्शियल गॅस सिलेंडरची किंमत 1785.50 रुपयांवर आले आहे. दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 1833 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. दिल्लीत आजपासून कमर्शियल एलपीजी 101.50 रुपयांनी महाग झाला आहे. तर कोलकातामध्ये एलपीजीची किंमत 1943 रुपयांवर आणि चेन्नईमध्ये गॅस सिलेंडरची किंमत 1999.50 रुपयांपर्यंत पोहचली आहे.
घरगुती एलपीजीच्या किमतींत कोणताही बदल नाही
1 नोव्हेंबर रोजी घरगुती एलपीजीच्या किमतींत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे अद्याप घरगुती एलपीजीच्या किमती स्थिर आहेत. त्यानुसार 14.20 किलोचा घरगुती गॅस सिलेंडर दिल्लीत 903 रुपये, कोलकात्यात 929 रुपये, मुंबईत 902.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 918.50 रुपयांना दराने दिला जात आहे.