सातारा, दि. 2 (प्रतिनिधी) –
अपघात झाला की सामान्य माणूस पोलिसांचा ससेमिरा नको म्हणून अपघातग्रस्तांना मदत करत नाहीत, तर राजकीय नेते व्यग्र दिनक्रमामुळे त्याकडे लक्ष देत नाहीत; परंतु माजी आयुक्त व माण-खटावचे नेते प्रभाकर देशमुख यांनी सोमवारी शिखर शिंगणापूर घाटात अपघातातील जखमींना कारमधून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.
अपघाताची माहिती जखमींच्या नातेवाइकांना दिल्यानंतर ते बारामतीकडे रवाना झाले. देशमुख यांच्यातील माणुसकीचे दर्शन जखमींच्या नातेवाइकांना व मतदारसंघातील जनतेला झाले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, प्रभाकर देशमुख हे मतदारसंघातील कामे आटोपून दहिवडीमार्गे बारामतीला निघाले होते.
त्यांची गाडी शिखर शिंगणापूरच्या घाटात आल्यानंतर त्यांच्यासमोर एका कारला अपघात झाला. अपघातग्रस्त कार उलटून रस्त्याकडेला पडली.
हा अपघात पाहून देशमुख यांनी त्यांची गाडी थांबवली. आपल्या सहकाऱ्यांसह अपघातग्रस्त कारमधून जखमी लोकांना बाहेर काढले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था करून, इस्लामपूर (जि. सांगली) येथे अपघाताची माहिती दिली.
जखमींचे नातेवाईक रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्यांना मदत करण्याचे आदेश त्यांनी तेथील कार्यकर्त्यांना दिले आणि ते पुढे रवाना झाले. देशमुख यांनी केलेल्या मदतीबद्दल जखमींच्या नातेवाइकांनी त्यांचे आभार मानले.