मुंबई – सैराट चित्रपटातून प्रसिद्धी मिळालेल्या अभिनेता आकाश ठोसरला त्याचा ड्रीम रोल मिळाला आहे. तो वास्तविक घटनांमधून प्रेरित ‘1962: दि वाॅर इन दि हिल्स’ या सिरीजमध्ये सैनिकाच्या भुमिकेत दिसणार आहे.
या सिरीजचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले असून यात अभय देओल व सुमीत व्यास यांसह अनेक प्रतिष्ठित कलाकार दिसणार आहेत. ही सिरीज डिस्ने+हाॅटस्टार व्हीआयपी आणि डिस्ने + हाॅटस्टार प्रिमिअमच्या सबस्क्रायबर्ससाठी 26 फेब्रुवारी 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे.
या सिरीजमध्ये 125 भारतीय सैनिक 3000 चीनी सैनिकांविरूद्ध कशा पद्धतीने लढले ही शौर्य आणि पराक्रमाची ऐकण्यात न आलेली कथा दाखवण्यात येणार आहे.
या सिरीजबाबत बोलताना आकाश ठोसरने सांगितले की, लहानपणापासून सैन्यात भरती होण्याचं स्वप्न होतं. चित्रपटात येण्याआधी मी दोनवेळा सैन्यात भरती होण्यासाठी परीक्षा दिली होती. सैन्यातच नव्हे तर पोलीस दलात देखील भरती होण्याचा प्रयत्न केला होता. मी जर अभिनेता नसतो तर नक्कीच आज सैन्यात देशसेवेत असतो. ही सिरीज माझ्यासाठी स्वप्नवत प्रोजेक्ट असल्याचेही त्याने म्हटले आहे.
पुढे बोलताना आकाश म्हणाला, पहिल्यांदाच सैनिकाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. माझी छाती आनंदाने भरून आलीय. वास्तविक जीवनात संधी मिळाली नसली तरी सिरीजमध्ये का होईना सैन्याचा पोशाख परिधान करण्याची संधी मिळाल्याने खूप आनंद झाला.
आकाश ठोसर या सिरीजमध्ये किशनची भूमिका साकारत आहे. जो मेजर सुरज सिंग (अभय देओल) नेतृत्वित बटालियनचा भाग आहे.