हरणी रस्त्याची अधिकाऱ्यांकडून पाहणी

परिंचे – परिंचे (ता. पुरंदर) ते हरणी नव्याने करण्यात आलेला रस्ता निकृष्ट दर्जाचा असल्याच्या अनेक तक्रारी राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी केल्या होत्या. याची दखल घेत अधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी करून ठेकेदाराला डांबरीकरण पुन्हा करण्याचे आदेश दिले आहेत.
चालू आर्थिक वर्षात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून परिंचे ते हरणी या सहा किमी अंतराच्या रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरकरणासाठी 3 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आठ दिवसांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. भरपावसात या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले असल्याने अनेक ठिकाणी हा रस्ता उखडला होता. रस्त्याच्याकडेला गटार व्यवस्था नाही. पावसाचे पाणी जाण्यासाठी टाकलेल्या नळ्या मातीत गाडल्या गेल्या आहेत. तसेच रस्त्याच्या साइडपट्ट्यांना रोलिंग केले नाही.
पुरंदर तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष पुष्कराज जाधव यांना या निकृष्ट कामाची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद सदस्य हेमंतकुमार माहुरकर व युवक कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मयूर मुळीक यांच्यासह ग्रामस्थांनी या रस्त्याची पाहणी करून निकृष्ट कामाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला होता. याबाबतचे वृत्त दैनिक प्रभातमधून प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्राद्वारे कळविले असल्याचे पुष्कराज जाधव सांगितले. ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत अधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनिल जाधव, निलेश जाधव, विजय जाधव, मानसिंग जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

या ठिकाणी गटार काढून 400 मीटरचा रस्ता पुन्हा डांबरीकरण करण्यात येणार आहे. साईडपट्ट्यांवर मजबूत रोलिंग करण्याच्या सूचना ठेकेदाराला देण्यात आल्या आहेत. ग्रामस्थांनीही कामाला सहकार्य करावे.
प्रशांत पवार, शाखा अभियंता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना

परिंचे (ता. पुरंदर) : येथील रस्त्याची पाहणी करताना अधिकारी प्रशांत पवार, पुष्कराज जाधव व ग्रामस्थ.

Leave A Reply

Your email address will not be published.