सोमवार पेठेतील वाहनांची तोडफोड वर्चस्ववादातून

पुणे,दि.19
सोमवार पेठेत वाहनांची तोडफोड करणाऱ्यांना दोघांना समर्थ पोलिसांनी अटक केली. त्यांच्या तीन अल्पवयीन साथीदारांनाही ताब्यात घेतले आहे. वर्चस्ववादातून परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी आरोपींनी बांबु आणि रॉडने कार, टेम्पो आणि रिक्षा आदी 11 वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले होते.

अक्षय रवि पाटील (20 , रा. बुधवार पेठ) आणि प्रतीक उर्फ सॅन्डी संदीप वैराट (48 , रा. कसबा पेठ) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी नितीन शिंदे ( रा., सोमवार पेठ) यांनी फिर्याद दिली त्यानुसार आरोपींविरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दोघा आरोपींना न्यायालयात हजर केले असता 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
सोमवार पेठेतील खडीचे मैदान येथे गुरुवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास तीन दुचाकीवरून आलेल्या 6 ते 7 जणांनी वाहनांची तोडफोड केली होती. त्यामध्ये कार, टेम्पो आदी 11 वाहनांचे 25 हजारांचे नुकसान झाले होते. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, नितीन अतकरे यांचे पथकाने तपास केला असता, आरोपी कसबा पेठेतील असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने अक्षय पाटील आणि प्रतीक वैराट यांना अटक केली तसेच, त्यांच्या तीन साथीदारांना ताब्यात घेतले. तिन्ही अल्पवयीन आरोपी विद्यार्थी असून शिक्षण घेत आहेत. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी भैय्या शिंदे हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. शिंदे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याचे सोमवार पेठेतील एका तरुणासोबत भांडण झाले होते, त्यातून त्याने इतर साथीदारांच्या मदतीने तोडफोड केल्याचे तपासातून उघड झाले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here