लोणीकाळभोरची “लालमाती’ सहा तास उधळली

राज्यभरातून आलेल्या पैलवानांच्या 27 निकाली कुस्त्यांचा आखाडा

लोणी काळभोर- महाराष्ट्र केसरी पैलवान बाला रफिक शेख व श्रीकृष्ण आखाडा सोलापूरचा पैलवान योगेश पवार यांची बरोबरीत सुटलेली कुस्ती यासोबतच आखाड्यात अनेक महाराष्ट्र केसरी, अर्जुन पुरस्कार विजेते, उपमहाराष्ट्र केसरी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते अशा पैलवानांची मांदियाळी, महाराष्ट्र केसरी पै. राहूल काळभोर यांनी संयोजकांसमवेत केलेले आखाड्याचे सुरेख नियोजन, सुमारे पंचवीस लाख रुपयांची रोख बक्षिसे, सर्व प्रेक्षकांना व्यवस्थित कुस्त्या पाहाता याव्यात म्हणून केलेली बैठक व्यवस्था व डिजिटल स्क्रीनची सोय आणि हजारो कुस्तीप्रेमी प्रेक्षकांची उपस्थिती यामुळे तब्बल सहा तास चाललेला निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा हे यावर्षीच्या लोणी काळभोर येथील श्रीमंत अंबरनाथ यात्रेचे वैशिष्ठ ठरले.

लोणी काळभोर (ता. हवेली) येथील ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाची वार्षिक यात्रा शुक्रवार (दि. 19 ) व शनिवारी (दि. 20) झाली. शनिवारी दुपारनंतर झालेल्या आखाड्यात महाराष्ट्र केसरी पै. आप्पालाल शेख, मुुन्नालाल शेख, रावसाहेब मगर, उपमहाराष्ट्र केसरी पै.मारूती वडार, शिवछत्रपती पुरस्कार विजेते पै. ज्ञानेश्वर गोचडे, शरद पवार, भरत म्हस्के, तान्हाजी बोडरे हे महाराष्ट्र राज्यातील नामवंत मल्ल उपस्थित होते. या आखाड्यात पंच म्हणून महाराष्ट्र केसरी पै. छोटा रावसाहेब मगर, यांच्यासमवेत दत्ता माने, रावसाहेब मगर, ज्ञानदेव पालवे, तान्हाजी भोडरे, भारत म्हस्के व शरद पवार यांनी काम पाहिले. कुस्ती मैदानाचे उद्‌घाटन ज्येष्ठ ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमआयटी विद्यापीठाचे अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, संत तुकडोजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू एस. एन. पठाण, ज्येष्ठ नेते माधव काळभोर व माजी जिल्हा परिषद सदस्य विलास काळभोर उपस्थित होते. समालोचक म्हणून युवराज केचे व बाबा निम्हण यांनी काम पाहिले.

दुपारी तीन वाजता गावकरी वाजत-गाजत मिरवणुकीने आखाड्यात आल्यानंतर कुस्ती आखाड्याला सुरुवात झाली. सुरुवातीला छोट्या-छोट्या कुस्त्या लावण्यात आल्या. त्यानंतर निकाली सत्तावीस कुस्त्यांना सुरुवात करण्यात आली. सर्वात मोठी व शेवटची दोन लाख इनामाची कुस्ती महाराष्ट्र केसरी पै. बाला रफिक शेख व श्रीकृष्ण आखाडा सोलापूरचा पै. योगेश पवार यांची कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. दुसरी दिड लाख रुपयांची कुस्ती गंगावेस तालमीचा पै. माऊली जमदाडे याने मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलाचा पै. साईनाथ रानवडे याच्यावर घिस्सा डाव टाकून जिंकली. सव्वा लाख रुपयांची तिसऱ्या क्रमांकावरील कुस्तीमध्ये शाहुपुरी तालमीचा पै. संतोष दोरवड याने आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलच्या पै. समाधान पाटील याच्यावर घुटना डाव टाकून मात केली. चौथ्या क्रमांकावरील एक लाख रूपये इनामाची कुस्ती गोकुळ वस्ताद तालमीचा पै. सागर बिराजदार व शाहुपुरी तालीम कोल्हापूरचा हसन पटेल यांच्यात झाली. ही कुस्ती बरोबरीत सुटली. पाचव्या क्रमांकाची एक लाख रुपये इनाम असलेल्या कुस्तीत आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचा पै. कौतुक डाफळे याने गंगावेश तालमीचा पै. विजय धुमाळ याच्यावर एकलंघी डाव टाकून मात केली.

  • युट्यूबवर लढतींचे थेट प्रक्षेपण…
    कुस्ती मल्ल विद्या, या ऑनलाईन पेजच्या माध्यमातून युट्युबवर या आखाड्याचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. त्यामुळे अनेक प्रेक्षकांनी घरी बसूनही ऑनलाईन कुस्ती पाहण्याचा आनंद लुटला. 2001 सालचे महाराष्ट्र केसरी पै. राहुल काळभोर व अंबरनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष योगेश काळभोर, उत्सव समितीचे अध्यक्ष आबासाहेब काळभोर त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले चोख, सुंदर नियोजन, त्याला गावकऱ्यांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे आखाडा अतिशय सुरेख व देखणा झाला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मल्लांनी व कुस्ती शौकीनांनीही आखाड्याच्या नियोजनाबद्दल संयोजकांचे कौतूक केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.