देहूगाव – येलवाडी गावात सुरू असलेल्या स्मशानभूमीचे आरसीसी सांगाड्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. कामाची मुदत संपूनही काम अपूर्णच आहे. शिवाय या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहे. त्यामुळे सध्या हे काम बंद आहे.
येलवाडी येथील स्मशानभूमीत 12 मीटर रुंद आणि 24 मीटर लांबीचा आणि 18 फूट उंचीचे सिमेंट कॉंक्रिटीकरणाचा आरसीसी सांगाडा व त्यावर पत्राशेड असा बारा लाखांचा प्रस्तावित खर्चाचे सभामंडपाचे काम मंजूर करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या निधीतून सभामंडपावरील पत्राशेडसाठी 6 लाख रुपयांचा तर चौदाव्या वित्त आयोगातील 3 लाख आणि ग्राम निधीतील 3 लाख असा भूमिगत भागापासून उभारण्यात येणारे फुटींग, आरसीसी, बीमचा सांगाडा कामासाठी 6 लाख रुपये प्रास्तावित खर्चाचा ठेका तेजस चव्हाण यांना देण्यात आला आहे. तर भूमिगत भराव आणि बांधकामावर होणारा खर्च हा ग्रामपंचायत ग्रामनिधीतून करणार आहे. झालेल्या कामातील सुमारे साडेचार लाख रुपये ठेकेदाराला अदा केले आहेत.
चव्हाण यांच्या कामाची मे महिन्यात मुदत संपली. मात्र अद्यापही हे काम अपूर्णच आहे. या कामामध्ये योग्य दर्जाचे स्टील, सिमेंट, वाळू, कच न वापरल्याने निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे. प्रत्यक्ष ठेका घेणारा नावापुरता असून हे काम उप ठेकेदार करीत आहे. या सर्व गोष्टींकडे वरिष्ठ प्रशासन अधिकारी तसेच ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नितीन गाडे यांनी निवेदनाद्वारे जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केला आहे.
एक महिन्यापूर्वी काम थांबविण्यात आले आहे. त्या कामाची रक्कमही पूर्ण दिलेली नाही, अशीमाहिती ग्रामसेविका पूनम शेवाळे यांनी दिली. तर करोना महामारी संकटामुळे कामाकडे दुर्लक्ष झाले असेल. सर्व सदस्यांचा विचार विनिमय करून योग्य ती कारवाई करण्यात येईल,
अशीमाहिती सरपंच हिराबाई बोत्रे यांनी दिली.
करोनामुळे कामास उशीर झाला आहे. मात्र कामातील साहित्य योग्य दर्जाचे वापरण्यात आले आहे. पाहणी करून निर्णय घेण्यात येईल.
– संजय कानडे, उप अभियंता पंचायत समिती, खेड