खेडच्या दक्षिण भागात मेंढपाळ दाखल मात्र, चारा-पाण्यासाठी रानोमाळ वणवण
चिंबळी, दि. 1 (वार्ताहर)- राज्यातील अनेक जिल्ह्यांत भीषण दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे चारा-पाण्याच्या प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे परजिल्ह्यातील मेंढपाळ चारा-पाण्याच्या शोधात खेड तालुक्यातील शिवारात दाखल झाले आहेत. मात्र, येथेही परिस्थिती फार वेगळी नसल्याने मेंढरांना कसे जगवावे हा प्रश्न मेंढपाळांसमोर असून चारा-पाण्याच्या शोधार्थ मेंढपाळांची रानोमाळ भटकंती सुरू आहे.
यंदा पाऊस कमी झाल्याने उत्पादनात घट झाली आहे. परिणामी ज्वारीचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे शेतात मेंढ्या बसवून मेंढपाळांना मोबदल्यात धान्य देणे; तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे शेतकऱ्यांना यंदा शक्य होत नाही. यामुळे यंदा मेंढपाळांवर चारा-पाण्याच्या शोधात भटकंती करण्याची वेळ आली आहे. खेड तालुक्यातील चिंबळी मोई, निघोजे, कुरुळी, केळगाव, मरकळ, सोळू, धानोरे, गोलेगाव आदीं गावांमध्ये अनेक मेंढपाळ व धनगर समाजबांधव दाखल झाले आहेत. आश्रय मिळेल तेथे बस्तान मांडून हे पशुपालक आलेला दिवस पुढे ढकलत आहे. मात्र, पावसाळ्यापर्यंतचा काळ कसा जाईल ही चिंता मेंढपाळांना सतावत आहे. शिवाय परिसरात पाण्याचीही भीषण टंचाई निर्माण झाली आहे.
दुष्काळाशी दोन हात करत पोटाची खळगी भरण्यासाठी आज इथे, तर उद्या तेथे याप्रमाणे भटकंती करत आहोत. 1972 च्या दुष्काळापेक्षा भयानक परिस्थिती यंदा जाणवत आहे. पूर्वी शेतकरी मेंढ्या शेतात बसवत त्या मोबदल्यात धान्य देत. त्यामुळे जगायला आधार मिळत असे. आता स्थिती बदलली असल्याचे मेंढपाळांनी सांगितले.