माळीणचे अर्धवट कामे पूर्ण करणार

विवेक वळसे पाटील यांचे आश्‍वासन

मंचर- आसाणे गावच्या हद्दीत पायरडोहचे काम पूर्ण झाले आहे. यातून माळीणसाठी पाणी देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. त्यामुळे पुढील वर्षी उन्हाळ्यात माळीणला पाणीटंचाई जाणवणार नाही. माळीणची जुनी शाळा ग्रामपंचायतीकडे हस्तांतरीत करुन शाळेत माळीणचे स्मृतीस्थळ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्‍वासन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी दिले.
माळीण दुर्घटनेच्या पाचव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मंगळवारी (दि. 30) स्मृतीस्तंभावर मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी तेथील शाळेत पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, उपसभापती नंदकुमार सोनावले, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, जिल्हा परिषदेच्या सदस्या रुपाली जगदाळे, पंचायत समितीचे सदस्य संजय गवारी, प्रकाश घोलप, विजय आढारी, दीपक चिमटे, सावळेराम लेंभे आदी मान्यवर उपस्थित होते. मच्छिंद्र झांजरे, तुकाराम लेंभे, अमोल अंकुश यांनी नवीन गावठाणाची हद्द निश्‍चित करुन गावठाणाला मंजुरी मिळावी, स्मृतीस्तंभावर छत निर्माण करण्यात यावे, स्मृतीस्तंभाची दुरुस्ती करावी, पाण्याचा प्रश्‍न सोडविण्याची मागणी केली.

उन्हाळ्यात टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो. नवीन घरांचे स्लॅब गळत आहेत याची गळती थांबवावी, जुन्या माळीण येथील शाळा ग्रामपंचायत अथवा पुनर्वसन समितीकडे देण्याची मागणी देखील करण्यात आली. यावेळी विवेक वळसे पाटील म्हणाले की, प्रत्येक आपत्तीला काळ हा उपाय असतो. माळीणकर यातून उभारी घेऊन आपले प्रश्‍न सोडवू लागले आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे. यातूनही काही कामे राहिली असतील तर ती पूर्ण करुन दिली जातील. सूत्रसंचालन सुहास झांजरे यांनी केले तर सरपंच हौसाबाई असवले यांनी आभार मानले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)