महावितरणची 33 गावांमध्ये 1563 कामे पूर्ण

बारामती मंडलात त्रिसूत्री मोहीम

बारामती- गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसह वीजबिल दुरुस्ती व नवीन वीजजोडणी या त्रिसुत्री मोहिमेतील एक गाव-एक दिवस या महावितरणच्या उपक्रमातून बारामती मंडलमधील 33 गावांमध्ये 1563 विविध कामे करण्यात आली.

बारामती परिमंडल अंतर्गत बारामती मंडलमधील सहा तालुके तसेच सातारा व सोलापूर जिल्ह्यात 139 गावांमध्ये एकूण 12181 कामे करण्यात आली आहेत. यामध्ये वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीचे 9862 कामे, वीजबिल व वीजमीटर संदर्भातील 2140 तक्रारींचे निवारण व 179 नवीन वीजजोडण्यांचा समावेश आहे. ग्रामीण भागात सुरळीत वीजपुरवठ्यासाठी वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्ती तसेच प्रत्यक्ष गावातच नवीन वीजजोडणी उपलब्ध करून देणे आणि वीजबिल व मीटर रिडींग संदर्भात असलेल्या तक्रारींचे जागेवरच निराकरण करणे यासाठी बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या संकल्पनेतून सातारा व सोलापूर जिल्ह्यांसह बारामती मंडल अंतर्गत बारामती, भोर, पुरंदर, इंदापूर, दौंड व शिरूर तालुक्‍यात एक गाव-एक दिवस हा उपक्रम सुरु आहे. यासोबतच गावकऱ्यांशी थेट संवाद साधून वीजसुरक्षा व ग्राहकसेवेबाबत प्रबोधन करण्यात येत आहे.

बारामती व केडगाव विभागातील प्रत्येकी 4 व सासवड विभागातील 25 अशा एकूण 33 गावांमध्ये वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीचे एकूण 1188 कामे करण्यात आली आहेत. यामध्ये रोहित्रातील तेलाची पातळी वाढविणे, तारांमधील झोल काढणे, वीजखांबाला रंगकाम, स्पेसर्स बसविणे, वीजपुरवठ्याला अडथळे ठरणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडणे, पीन व डिस्क इन्सूलेटर बदलणे, वितरण रोहित्रांना अर्थिंग करणे, डिस्ट्रीब्यूशन बॉक्‍सचे क्‍लिनिंग व आवश्‍यक दुरुस्ती, किटकॅट बदलणे, सडलेले वीजखांब बदलणे, वाकलेले वीजखांब सरळ करणे, नादुरुस्त व धोकादायक सर्व्हिस वायर्स बदलणे आदी कामांचा समावेश आहे.

याशिवाय सदोष व नादुरुस्त वीजमीटर बदलणे, वीजबिलांची दुरुस्ती, वीजमीटरची तपासणी, नावात बदल, सदोष व नादुरुस्त मीटर बदलून देणे, वीजदेयके मिळत नसल्यास ते उपलब्ध करून देणे, मीटर घराबाहेर काढणे अशा प्रकारची 356 कामे करण्यात आली तर आवश्‍यक कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर 19 ग्राहकांना जागेवरच नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. यासोबत गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांना विविध योजनांसह महावितरणच्या सर्व ग्राहकसेवा, मोबाईल ऍप आदींची माहिती देण्यात आली व वीजसुरक्षेबाबत प्रबोधनही करण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.