बैलगाडा शर्यत बंद करण्याचे षड्‌यंत्र तुमचेच

डॉ. कोल्हे : प्रचारार्थ भोसरी विधानसभा मतदारसंघातील जनतेशी साधला संवाद

चऱ्होली- वन्य प्राणी संरक्षण सूचीमध्ये ज्यावेळी बैलांचा समावेश झाला, त्यावेळी तुम्ही त्या समितीत होता. मग खासदार त्यावेळी मूग गिळून गप्प का बसले? बैलगाडा शर्यत बंद करण्याचे षड्‌यंत्र तुमचेच होते, असा घणाघात डॉ. अमोल कोल्हे यांनी केला.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ भोसरी विधानसभा मतदारसंघातील जनतेशी संवाद साधण्यात आला. त्यावेळी चऱ्होली येथील सभेत डॉ. कोल्हे बोलत होते. यावेळी माजी आमदार विलास लांडे, माजी नगरसेवक घनशाम खेडकर, संतोष बुरडे, आनंद तापकीर, नगरसेविका विनया तापकीर, अनिल तापकीर, शांताराम तापकीर, सुरेश तापकीर, चंद्रकांत तापकीर, भाऊसाहेब गिलबिले, शशिकांत बुरडे, तुषार कोतवाल आदी मान्यवरांसह मतदार उपस्थित होते.
डॉ. कोल्हे म्हणाले की, जे करणार आहे, त्यावरच बोलणार आहे.

आपल्या मतदारसंघाचे दुर्दैव असे की, विकासाचा कोणताही अजेंडा गेली 15 वर्षे नाही. त्यामुळे गेली 15 वर्षे अधोगती झाली आहे. हे चित्र बदलण्यासाठी आता परिवर्तन झालेच पाहिजे. ज्या बैलगाडा शर्यतीवर ग्रामीण भागाचा आर्थिक कणा अवलंबून आहे. तोच या खासदारांनी मोडून टाकला आहे. परिणामी बैलगाडा शर्यतीवर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था कोलमडून गेली आहे. आता आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. मला कोणावर वैयक्तिक टीका करायची नाही; पण एक मतदार म्हणून विकासाबाबत जे-जे आवश्‍यक आहे, त्यावर मी बोलणारच.

मतदारसंघाच्या भौगोलिक आणि ऐतिहासिक बाबींचा विचार करुन मी एक व्हिजन डॉक्‍युमेंट तयार केले आहे. ते प्रत्येकाला प्रगतीसाठी आधारवड ठरणार आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवून यंदा फळीफोड करणार म्हणजे करणारच. या भागातील प्रश्‍न सोडविताना इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पासाठी प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही डॉ. कोल्हे यांनी दिली. कामगार नेते सुरेश तापकीर यांनी आभार मानले.

  • साडेतीन लाखांचा निधी सुपूर्द
    विकास करणारा खासदार पाहिजे, विकास अडवणारा नको अशी भूमिका घनश्‍याम खेडेकर, लक्ष्मण तापकीर यांनी मांडली. यावेळी लोकवर्गणीतून 30 लाख 60 हजार रुपयांचा निधी डॉ. कोल्हेंकडे सुपूर्द करण्यात आला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.