फॉरेनची पाटलीन होणार अवसरीची सून

मंचर – अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील वर सुहास आणि न्यूयॉर्क (अमेरिका) येथील वधु क्रिस्टीना यांचा साखरपुडा हिंदू संस्कृतीनुसार अवसरी बुद्रुक येथे झाला. यावेळी वधु आणि वरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन केले.

अवसरी बुद्रुक येथील हरिश्‍चंद्र बाबुराव हिेंगे पाटील आणि वसुधा हिंगे पाटील यांचा मुलगा सुहास हा 12 वर्षांपासून ऑस्ट्रेलिया येथे फायनान्स कंपनीमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहे. तसेच अमेरिका-न्यूयॉर्क येथील रिकी जेम्स गोन्का आणि नॅन्सी बॅंडफोर्ड या दाम्पत्याची कन्या क्रिस्टीना ही ऑस्ट्रेलियामध्येच सरकारी उच्चपदावर कार्यरत आहे. सुहास आणि क्रिस्टीना यांची इंटरनेटच्या माध्यमातून ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघांच्याही कुटुंबाच्या संमतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अवसरी बुद्रुक येथील यशोदिप मंगल कार्यालयात साखरपुडा पार पडला.

साखरपुडा सोहळ्यास वधु आणि वरांनी महाराष्ट्रीय वेशभूषा परिधान केली होती. अमेरिकेची वधू कशी दिसतेय, कशी बोलतेय हे पाहण्यासाठी साखरपुड्याच्या सोहळ्याला परिसरातील महिला, पुरुष आणि तरुणांनी गर्दी केली होती. वधु क्रिस्टीना हिने पुणे शहर आणि ग्रामीण भागातील शेती, राहणीमान, माणुसकी पाहुन आनंद व्यक्त केला. लग्नाला आल्यानंतर आवर्जून एक महिना अवसरीला राहून संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार असल्याचे तिने सांगितले. साखरपुडा सोहळ्याला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, कारखान्याचे संचालक ऍड. प्रदीप वळसे पाटील, शरद बॅंकेचे माजी संचालक संजय चव्हाण, सोसायटीचे अध्यक्ष कांताराम बापु हिंगे, माजी सरपंच अशोक हिंगे पाटील, उद्योजक दिनेश चव्हाण, कात्रज दूध संघाचे माजी अधिकारी बळवंत हिंगे, ग्रामपंचायत सदस्या आशाताई चव्हाण आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)