कोळकी – फलटणच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची तांत्रिक कौशल्ये विकास करण्यासाठी त्यांना विविध कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची सुवर्णसंधी महाविद्यालयाने उपलब्ध केल्याची माहिती प्राचार्य डॉ. अजय देशमुख यांनी दिली.
पुणे येथील केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन केंद्रात सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 32 तर कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या 33 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. डॉ. एम. सेल्वा बालन यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व संशोधनाची संधी मिळाली आहे. ही संस्था पुरासह पाण्याच्या प्रवाहाच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा अभ्यास करते. फोर्ब्ज मार्शल या कंपनीत मेकॅनिकल व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
स्टीम इंजिनिअरिंग, इंस्ट्रुमेंटेशन व ऑटोमेशन इंजिनिअरिंगमध्ये ही कंपनी काम करते. ऑनलाइन प्रशिक्षण व सर्टिफिकेशनमधील “सिंपली लर्न’ या संस्थेत तृतीय वर्ष इंजिनिअरिंगमधील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कमिन्स कंपनीने हे प्रशिक्षण प्रायोजित केले असून विद्यार्थ्यांचा “इंडस्ट्री रेडीनेस’ वाढवण्यासाठी हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.
“स्पोकन ट्युटोरिअल’, “आयआयटी मुंबई’ यांच्या माध्यमातून सॉफ्टवेअर कोर्सेस व द्वितीय वर्ष इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात येत आहे. पुणे येथील इलेक्ट्रॉनिक्स सहकारी सोसायटीचे चेअरमन आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे विश्वस्त अशोक सराफ यांच्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कमी वेळेत हॉस्पिटल बांधकामासाठी लागणारे नियोजन, डिझाइन, उपकरणे याबाबत इंटर्नशिप मिळाली आहे.
बहुराष्ट्रीय कंपन्यांचे सल्लागार म्हणून काम करणाऱ्या सराफ यांच्या ज्ञान व कौशल्यांचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना तांत्रिक कौशल्ये विकसित करण्यासाठी या कंपन्यामध्ये काम करण्याचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळेल. यासाठी विद्यार्थ्यांना प्रथम वर्षांपासूनच महाविद्यालयाने अशा संधी उपलब्ध केल्या आहेत, असे प्राचार्य डॉ. देशमुख म्हणाले.