पोलिसांना मदत करणाऱ्या लोकांचा सन्मान केला जाईल

अप्पर अधीक्षक धीरज पाटील ; चोरट्याचा पाठलाग करून पकडणाऱ्या सायलीचा गौरव

सातारा, दि. 31 (प्रतिनिधी)
पोलिसांना मदत करण्यासाठी लोक पुढे येतात ही अभिमानाची गोष्ट आहे. कायदा व सुव्यस्था राखताना पोलिसांना मदत करणाऱ्या लोकांचा योग्य तो सन्मान केला जाईल. कारण पोलीस अन्‌ जनता यांच्यातील संबंध दृढ होतील आणि परिणामी गुन्हेगारीवर मात मिळवण्यास मदत होईल, असे उद्‌गार अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी काढले. मोठ्या धाडसाने चोरट्यांचा पाठलाग करून पकडणाऱ्या सायली त्रिंबके या युवतीचा त्यांच्या कार्यालयात बुधवारी सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

दि. 23 जुलै रोजी मध्यरात्री उशिरा सायली त्रिंबके यांना त्यांच्या पार्लरबाहेर काही आवाज आल्याने उठून पाहिले असता बाहेर अंदाजे चार ते पाच चोरटे चोरीच्या उद्देशाने आल्याचे त्यांच्या लक्षात आले. धाडसाने चोरट्यांचा पाठलाग करत त्यातील एका अल्पवयीन मुलास पकडले.

त्यानंतर तातडीने पीसीआरला फोन केल्यानंतर पोलिसांनी पहाटे पाचच्या सुमारास त्या अल्पवयीन चोरट्यास ताब्यात घेतले. अल्पवयीन संशयिताकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पुढील कारवाईची सूत्रे गतिमान करत शाहूपुरी पोलिसांनी टोळी जेरबंद केली.

त्यानंतर शाहूपुरी पोलिसांकडून सायलीच्या धाडसाचे नकळत कौतुक करण्याचे राहून गेले होते. त्यावर प्रभात’ने  “”शाहूपुरी पोलिसांची श्रेयासाठी धडपड” या मथळ्याखाली दि. 30 रोजी वृत्त प्रसिध्द केल्यानंतर जिल्हा पोलीस दलाकडून त्याची दखल घेण्यात आली.

अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी सायली त्रिंबके हिचा त्यांच्या कार्यालयात सन्मान केला. यावेळी पोलीस निरीक्षक मुगुट पाटील उपस्थित होते. यावेळी सायली त्रिंबके म्हणाली, “सत्कार महत्वाचा नसून त्यातून मिळणारी प्रेरणा महत्वाची आहे. कारण त्या प्रेरणेतून मिळणारी उर्जा नवीन काही तरी करण्याचे बळ देते.’

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.