पुणे – सल्लागाराचा अहवाल नसतानाच मान्यतेसाठी धावाधाव

वैद्यकीय महाविद्यालयासाठी दोन दिवसांत मेडिकल कौन्सिलकडे प्रस्ताव

पुणे – महापालिकेतील सत्ताधारी वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव येत्या दोन दिवसात इंडियन मेडिकल काऊन्सिलकडे मान्यतेसाठी पाठवण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात सल्लागाराकडून अद्याप अहवालच आला नसल्याचे उघड झाले आहे. हा अहवाल मिळवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत.

अरविंद शिंदे हे स्थायी समिती अध्यक्ष असताना त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाची तरतूद अंदाजपत्रकात केली होती. मात्र, त्यावेळीही त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. त्या तरतुदीचे अन्यत्र वर्गीकरण करण्यात आले. तीच बाब अन्य स्थायी समिती अध्यक्षांच्या काळातही झाली. कारण, भाजप सदस्य मुरलीधर मोहोळ हे स्थायी समिती अध्यक्ष असताना त्यांनीही हा प्रकल्प आपल्या अंदाजपत्रकात मांडला. त्याची तरतूदही केली. परंतु तिचेही वर्गीकरण करण्यात आले.

अहवालाला उशीर होत असल्याबाबत मंगळवारीच स्थायी समिती अध्यक्षांनी कानउघडणी केली होती. महाविद्यालयासाठी आवश्‍यक राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध विभागांच्या परवानगी या बैठकीत चर्चा करण्यात आली. “हे महाविद्यालय उभारणीबाबत कालबद्ध कार्यक्रम आखून त्याची अंमलबजावणी करा. शहराच्या हितासाठी आणि महापालिकेची आरोग्य सेवा सुधारण्यासाठी या प्रकल्पाला प्राधान्य देऊन अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्‍चित करा, अन्यथा आम्हाला वेगळा मार्ग शोधावा लागेल,’ या शब्दात प्रशासनाला सुनावण्यात आले होते. मात्र त्यानंतरही काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे अहवालच नाही तर कौन्सिलकडे पाठवणार काय, असा प्रश्‍न विचारला जात आहे.

सल्लागार कंपनीचा प्रतिसादच नाहीवैद्यकीय महाविद्यालयासाठी एक सल्लागार कंपनी नेमण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून भौतिक, तांत्रिक, आर्थिक आराखडे तयार करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर याची मान्यता घेण्यासाठी आवश्‍यक कार्यवाही सल्लागारानेच कारावयाची आहे. अद्याप सल्लागाराकडून यावर कोणतेच काम करण्यात आलेले नाही. या सल्लागार कंपनीशी आरोग्य प्रमुखांनीही अनेकदा चर्चा केली आहे. मात्र संबंधित कंपनीने अद्याप अहवाल देण्याबाबत काहीच प्रतिसाद दिला नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.