पुणे – राज्यातील महानगरपालिका, प्राधिकरणे यांच्यासाठी एकसमान बांधकाम नियमवाली करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार “एकत्रित बांधकाम विकास नियंत्रण नियमावली’ प्रसिध्द करण्यात आली होती. या नियमावलीच्या प्रारुपावर आलेल्या हरकतींवर सुनावणी घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच एकसमान बांधकाम नियमावली लागू केली जाणार असल्याची माहिती नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना स्वत:च्या हद्दीचा विकास आराखडा तयार करण्याचे अधिकार देण्यात आले आहे. तर जिल्ह्यातील हद्दीत नगररचना विभागाकडून प्रादेशिक आराखडा आणि त्यांची नियमावली तयार करण्यात येते. त्यानुसार बांधकामांना परवानगी देण्यात येते. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांची नियमावली वेगवेगळी असल्याने आणि प्रत्येक नियमावलीत काही त्रुटी असल्याने गोंधळ निर्माण होतो. तो दूर करण्यासाठी आणि बांधकाम नियंत्रण नियमावलीतील त्रुटी दूर करण्यासाठी “एकत्रित बांधकाम विकास नियंत्रण नियमावली’ तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठीची अधिसूचना 8 मार्च 2019 रोजी प्रसिध्द केली. यावर आलेल्या हरकती-सूचनांवर सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर हा अहवाल अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे सादर केला आहे.