पुणे – सलग दुसऱ्या दिवशी पालिकेत कारवाई सुरू

आजपासून लेट मार्क न लावता थेट घरी पाठवणार

पुणे – महापालिकेच्या “लेटलतिफ’ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर सलग दुसऱ्या दिवशीही कारवाई करण्यात आली. त्यामध्ये 89 कर्मचाऱ्यांच्या हजेरी पत्रकावर लेटमार्क करण्यात आला.

अतिरिक्‍त आयुक्त विपीन शर्मा यांच्या आदेशानुसार सोमवारपासून या कारवाईला सुरूवात झाली आहे. सोमवारी 215 जणांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार मंगळवारीही सकाळी 10 वाजता मुख्य प्रवेशद्वारावर बंद करण्यात आले. सोमवारच्या कारवाईचा सकारात्मक परिणाम मंगळवारी पहायला मिळाला. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी 89 जणांवर कारवाई करण्यात आली. यासोबतच चहा आणि अन्य कारणांच्या निमित्ताने सतत इमारतीबाहेर जाणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचे पहायला मिळाले.

कर्मचाऱ्यांना आपली जागा सोडून दुसऱ्या खात्यात किंवा महापालिका भवनाच्या बाहेरच जायचे असेल तर यापुढे खातेप्रमुखांची परवानगी घेऊनच बाहेर जावे असे आदेश देण्यात आले आहेत. शिस्तभंगाच्या कारवाईच्या धास्तीमुळे अनेक कर्मचारी वेळेवर कामावर उपस्थित झाल्याचे मंगळवारी पाहण्यास मिळाले.

हे प्रमाण आणखी कमी करण्यासाठी तसेच बेशिस्त कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाईची आवश्‍यकता असल्याचे मत वरिष्ठ अधिकारी व्यक्त करत आहेत.

दोन दिवस प्रवेशद्वार बंद करुन उशिरा येणाऱ्यांच्या नोंदी घेण्यात आल्या. परंतू, बुधवारपासून उशिरा येणाऱ्यांना थेट घरी पाठवण्यात येणार असून त्यांची त्यादिवशीची रजा मांडली जाणार आहे.
– माधव जगताप, सुरक्षा विभाग प्रमुख.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×