राहत्या घरात घेतला गळफास; नाराज असल्याची कर्मचाऱ्यांची माहिती
सातारा, दि. 6 (प्रतिनिधी)
पाडळी ता. कोरेगाव येथील मुळच्या रहवाशी व सध्या भंडारा येथे एकात्मिक बाल सेवा प्रकल्पाच्या युवा बाल विकास प्रकल्प अधिकारी असलेल्या शितल अशोक फाळके (वय-28, रा. पाडळी, ता. कोरेगाव, सातारा, सध्या रा. लाखनी) यांनी लाखनी (जि.भंडारा) येथे राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली.
ही घटना शनिवारी (ता.6) पहाटे 3.30 वाजता उघडकीस आली. याप्रकरणी लाखनी पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच फाळके यांच्या पाडळी या गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
शितल फाळके या लाखनी येथे बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून 2017 मध्ये रुजू झाल्या होत्या. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ख्याती होती. गेली काही दिवस त्या तणावात असल्याचे बोलले जात आहे.
शुक्रवारी (ता. 5) कार्यालयात त्या नाराज असल्याचे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. शुक्रवारी रात्री त्यांनी आणि त्यांच्या आईने सोबत जेवण केले आणि नंतर झोपण्यासाठी गेल्या.
पहाटेच्या सुमारास त्यांची आई लघुशंकेसाठी बाथरूमकडे गेल्या असता त्यांना शितल यांनी ओढणीच्या साहाय्याने गजाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसले.
घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आला.
याप्रकरणी लाखनी पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास लाखनी पोलीस करत आहेत. या घटनेने महिला व बाल विकास विभागत खळबळ उडाली आहे.