परप्रांतीय कंपन्यांच्या विळख्यात बियाणे बाजार

पेरणी करण्यासाठी लागणाऱ्या विविध जातीच्या बियाणांची बाजारात मोठी रेलचेल दिसत आहे. पाऊस नसताना देखील बियाणे बाजार भरलेला आहे. यंदा बाजारात आंध्र प्रदेश, तमिळनाडू व इतर राज्यातील नामांकित कंपनीचे बियाणे दाखल झाले आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी मोठमोठ्या जाहिराती केल्या जात आहेत. तसेच आठवडे बाजारात भोंगे लावून याची माहिती शेतकऱ्यांपर्यत पोहोचविली जात आहे. त्यामुळे परप्रांतीय कंपन्यांचे बियाणे शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढणार की डुबविणार याची चर्चा रंगल्या आहेत.

यावर्षी चांगला पाऊस पडणार म्हणून अनेक शेतकऱ्यांनी महागडे बियाणे खरेदी करून आपल्या शेतात पेरले देखील आहेत, परंतु दमदार पाऊस झाल्याशिवाय पेरणी करणे हे धोक्‍याचे असते हे शेतकऱ्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. कोणत्याही अंदाजावर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी दमदार पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नका असा सल्ला शासनाच्या कृषी खात्याने दिला असला तरी सुद्धा भिगवण, नरसिंहपूर, निर्वांगी बावडा, वडापुरी परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली आहे. खरीप हंगाम आता काही दिवसांवर आला असल्यामुळे नामांकित बियाणे व रासायनिक खत निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी ग्रामीण भागात अधिक खपासाठी जाहिरात युद्ध सुरू केले आहे. दुसऱ्या बियाणांच्या तुलनेत आपला वाण कसा सरस आहे हे शेतकऱ्यांना पटवून दिले आहे. तर यासाठी अनेक कृषी पदवीधर युवकांना कंपन्यांनी हाताशी धरून गावागावातील शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचे काम सुरू केले आहे.

गेल्या तीन-चार वर्षांपासून पावसाने विलंब लावला असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. हक्काचे उत्पादन हाती नसल्यामुळे आर्थिक विवंचनेत शेतकरी सापडलेला आहे, असे असतानाच दारातल्या मुक्‍या जनावरांना चारा-पाणी नाही तर घरातल्या लोकांच्या हाताला काम नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात शेती करायची तरी कशी असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. परप्रांतीय कंपनीने आपले बियाणे विकले जावे व यातून मोठी कमाई व्हावी, यासाठी मोठा बोलबाला केला आहे. यातून आपली फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधून बियाण्यांची खरेदी करणे गरजेचे आहे.

ग्रामीण भागात पूर्वीच्या काळी आपल्या शेतात पिकलेला माल बियाणे म्हणून तयार केला जात असे व तो वर्षभर साठवून ठेवून पेरणीच्या वेळेस याच बियाणाची पेर होत असे. मात्र, आता अनेक कंपन्या बाजारात उतरल्या आहेत. यामुळे अस्सल बियाणे नामशेष होत आहेत. त्यामुळे आपल्या शेतातील पिकलेले बियाणे ग्रामीण भागात आता पाहण्यास मिळत नाही. केवळ कंपन्यांच्या जाहिरातीवर अवलंबून राहिल्यामुळे शेतकरी रसातळाला जात आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांना या गोष्टीचा फटका बसल्यामुळे नको रे बाबा गवगवा करणाऱ्या कंपनीचे बियाणे असे शेतकरी म्हणत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.