पत्नीच्या खुनानंतर फरार आरोपी जेरबंद

उरूळी देवाची येथील घटनेत पोलिसांची कारवाई

लोणी काळभोर- पत्नीचे कोणाबरोबर तरी अनैतिक संबंध आहेत, असा संशय घेऊन पत्नीचा खून केल्याप्रकरणी फरार पतीला पोलिसांनी जेरबंद केले. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. भालचंद्र गिराप्पा सुर्वे (वय 37, रा. आचेगाव, जि. सोलापूर), असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे.

अर्चना ऊर्फ बबली भालचंद्र सुर्वे (वय 28, सध्या रा. अशोकनगर, ऊरूळी देवाची, ता हवेली. मूळ रा. आचेगांव, जि. सोलापूर) या विवाहितेचा खून झाला होता. याप्रकरणी तिचे वडील दत्ता बागडे (सध्या रा. ऊरूळी देवाची, मूळ रा. इटकळ, जि. उस्मानाबाद) यांनी फिर्याद दाखल केली होती.

मयत अर्चना व भालचंद्र यांचा विवाह 2008 मध्ये झाला होता. ती नांदण्यास गेल्यापासून पती-पत्नीमध्ये नेहमीच वाद होत असत. याला कंटाळून अर्चना दोन मुले साहिल व श्रावणी यांना घेऊन आई वडीलांकडे ऊरूळी देवाची येथे आली होती. ती विमाननगर येथील एका कंपनीत स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करून उदरनिर्वाह करीत होती. रविवारी सर्वांना सुट्टी असल्याने सर्वजण घरी होते. सकाळी तिचे आईवडील, दोन्ही चर्चमध्ये गेले होते. यावेळी अर्चना घरी एकटीच होती. त्यावेळी पती भालचंद्र सुर्वे घरी आला. यावेळी दोघांमध्ये पुन्हा वादावादी झाली. यावेळी भालचंद्र सुर्वे यांनी पत्नीवर कोयता व चाकूने सपासप वार केले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. शेजारचे लोक आल्याने आरोपी भालचंद्र सुर्वे हा पसार झाला होता. पोलिसांनी परिसरात शोध मोहीम राबवली. गोपनीय खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. लोखंडे, पोलीस कर्मचारी डी. डी. साळुंखे, हेमंत कामठे यांनी अशोकनगर परिसरात शोध मोहीम राबवून त्याला तातडीने जेरबंद केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. लोखंडे करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.