पुणे : जागतिक व्याघ्रदिनाचे औचित्य साधत शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी कात्रज प्राणी संग्रहालयातील “तानाजी’ या वाघास एका महिन्यासाठी दत्तक घेतले आहे. या वाघासाठी येणारा सर्व खर्च या दत्तक योजनेते भानगिरे यांच्याकडून दिला जाणार आहे. दरम्यान, शहरातील नागरिक तसेच लोकप्रतिनिधींनी या दत्तक योजनेत जास्तीत जास्त सहभागी व्हावे, असे आवाहनही भानगिरे यांनी केले आहे.
महापालिकेच्या कात्रज येथील स्वर्गीय राजीव गांधी प्राणी संग्रहालयात सुमारे अडीचेंहून अधिक प्राणी असून त्यांच्या व्यवस्थापनासाठी महापालिकेस मोठा खर्च येतो. ही बाब लक्षात घेऊन प्राणी संग्रहालयाकडून प्राणीदत्तक योजना राबविण्यात येते. प्राण्यांच्या व्यवस्थापनासाठी निधी उपलब्ध व्हावा तसेच नागरिकांमध्ये प्राण्यांबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने हा प्राणीदत्तक उपक्रम राबविला जातो. व्याघ्र दिना निमित्ताने भानगिरे यांनी या उपक्रमांतर्गत तानाजी या वाघास दत्तक घेतले असून त्यासाठी एका महिन्याचा खर्च भानगिरे देणार आहेत, संग्रहालयाचा योजनेनुसार, एका वाघाचा खर्च महिन्याला 15 ते 20 हजार रुपयांचा आहे.