मंचर- आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील विविध गावांत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे डिंभे धरणात (हुतात्मा बाबू गेणू सागर) रविवारी (दि. 28) सकाळी आठ वाजेपर्यंत 59.22 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील डोण, तिरपाड, पिंपरगणे, आहुपे, माळीण, बोरघर भागात मुसळधार पाऊस पडत आहे. डिंभे धरणात सद्यस्थितीत 59.22 टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी याचवेळी धरणात 82.77 टक्के पाणीसाठा होता. त्या तुलनेत यावेळी पावसाचे प्रमाण कमी असल्याने धरण साठ्यात पाण्याची आवक कमी असल्याचे दिसून येते. डिंभे धरण परिसरात शनिवारी (दि. 27) सकाळी आठ ते रविवारी (दि. 28) सकाळी आठ वाजेपर्यंत 99 मि.मी. पावसाची नोंद झाली. तसेच घोडेगावमध्ये 49 मि.मी., मंचरमध्ये 28 मि.मी., कळंबमध्ये 39 मि.मी. तर पारगावमध्ये 15.16 मि.मी. पाऊस झाल्याचे घोडेगाव तहसील कार्यालयातून सांगण्यात आले.