जुन्नरमधील अवैध वाहततुकीला आशीर्वाद?

प्रवाशांचा सवाल : चालकांचा मुजोरपणा नागरिकांच्या जीवावर बेतोय

खोडद- सध्या लग्नसराईमुळे जुन्नर तालुक्‍यात अवैध प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय बोकळला असून मुजोर दंडेलशाही करणाऱ्या या अवैध वाहतूकदारांना आशीर्वाद आहे, तरी कोणाचा?असा प्रश्‍न तालुक्‍यातील प्रवासी उपस्थित करू लागले आहेत.

तालुक्‍यात मोठमोठ्या बाजारपेठा लग्नसराई, यात्रा, जत्राच्या गर्दीमुळे फुलल्या आहेत. त्यातल्या त्यात मुख्य बाजारपेठांमधील दुकानदारांच्या व खासगी वाहनांच्या अतिक्रमणांमुळे बरेचसे रस्ते धोकादायक झाले असून रस्त्यांवर होणारी वाहतूककोंडी ही नित्याचीच बाब ठरत आहे. आळेफाटा बसस्थानक, ओतूर-कल्याण रस्ता, जुन्नर बसस्थानका समोरील रस्ता तसेच नारायणगावातील बसस्थानक ते पूर्व वेस व बसस्थानक ते खोडद रस्ता या रस्त्यांवर तर ही अवैध वाहतूक करणारी वाहने रस्त्यांवरच उभी करून चालक नागरिकांना दमदाटी करीत आहेत.

बऱ्याचशा ग्रामपंचायतींने या रस्त्यांवर वाहतूककोंडी होऊ नये म्हणून अनेक कर्मचारी नेमले आहे; परंतु या कर्मचाऱ्यांना ना न जुमानता हे चालक रस्त्यातच हाका मारून प्रवासी भरून आपली वाहने पायी चालणारे नागरिक, महिला व दुचाकी वाहनांच्या अंगावर घालत आहेत. काही वाहने तर तासन्‌तास रस्त्याच्यामध्ये उभी राहत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत आहे. त्याचबरोबर अवैध वाहतूक करणारी यातील बरीचशी वाहने कालबाह्य झाली असली तरीही ती रस्त्यावर बेफान वेगान पळवत असल्यामुळे अनेकवेळा मोठेमोठे अपघात होत आहेत. त्यामुळे अवैध वाहतूक व क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी नेणाऱ्या कालबाह्य झालेल्या वाहनांवर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी. त्याचबरोबर गावातील रहिवासी, दुचाकीस्वार यांना दमदाटी करून त्यांच्या अंगावर गाड्या घालणाऱ्या मुजोर वाहनचालकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सर्व स्तरातून जोर धरू लागली आहे.

  • अपघातांना ठरताहेत जबाबदार
    जुन्नर रस्त्यावर तसेच कल्याण-आळेफाटा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचे अपघात होत आहे. काही दिवसांपूर्वी ओतूर जवळ मोठा अपघात होऊन तीन ज्येष्ठ महिलांना आपला प्राण गमवावा लागला होता. तर पूर्वी दरंदळे मळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याला अशा वाहनाची धडक बसून गंभीर अपघात झाला होता आणि त्यांच्या उपचारासाठी 2 लाखापर्यंत खर्च आला होता.
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×