जीवनगाणे: वाकू नका झुका…

अरुण गोखले

श्री. साठेसर वर्गात आले. मुलांनी केलेल्या अभिवादनाचा स्वीकार करून, त्यांना बसा बसा असे सांगत, ते फळ्याकडे वळले. त्यांनी फळ्यावर दोन शब्द लिहिले. त्यातला एक शब्द होता “वाका’ आणि दुसरा शब्द होता “झुका.’
मुलांकडे पाहात त्यांनी विचारले, “या शब्दांचा अर्थ काय?’

मुलांनी त्या दोन्ही शब्दांचा त्यांना माहीत असलेला अर्थ आणि त्या मागची कृती सांगितली.
त्यावर साठेसर म्हणाले, “मुलांनो! हे समानार्थी दोन्ही शब्द जरी एकच वाकण्याची कृती सांगत असले तरी त्या दोन्हीमध्ये फार मोठा फरक आहे. तो नेमका काय? हे आता आपण जाणून घेऊया.’
आता हे वाक्‍य पाहा हं… “सरदार आला, त्याबरोबर सर्व शिपाई त्याच्या समोर वाकून उभे राहिले.’
या वाक्‍यातील शिपायांनी केलेली कृती ही त्यांच्या मनातील सरदाराबद्दल असणारी भीती, दरारा, जरब, आपण जर त्याच्यापुढे वाकून उभे राहिलो नाही तर, तो आपल्याला शिक्षा करेल, या आणि अशा भावनेतून घडलेली आहे.
आता हे दुसरे वाक्‍य पाहा. “ज्ञानदेवांनी पैठणच्या धर्मसभेत रेड्यामुखी वेद वदवून दाखविले आणि सारा ब्रह्मवृंद त्यांच्या चरणावर विनम्रभावे झुकला. इथे जी कृती घडली आहे ती त्या समोरच्या व्यक्‍तीची योग्यता, श्रेष्ठता पाहून. त्यांच्याबद्दल मनात जागलेल्या प्रेम आदर आणि मोठेपणातून. या झुकण्यात लिनता आहे, नम्रता आहे.’
मला तुम्हाला हेच सांगायचे आहे की, तुम्हीसुद्धा जीवनात कोणापुढे वाकायचे नाही आणि कोणापुढे अनन्य शरणांगत भावाने झुकायचे ते नीट समजून घ्या.

भीती, लाचारी ह्याने कधीच कोणापुढे वाकू नका. त्या वाकण्याने तुमची निंदा होईल, तुमची असमर्थता, तुमची लाचारी, नाकर्तेपण दिसून येईल. तेव्हा समोरचा माणूसच कोणत्याही प्रसंगी तुमच्या धैर्याची कसोटी पाहणाऱ्या प्रसंगापुढे किंवा संकटापुढेही वाकू नका. त्यांना धैर्याने हिमतीने तोंड द्या. तुम्ही झुकू नका तर त्याला तुमच्या पायाशी झुकवा.

तुम्ही मात्र जे जे कोणी पूज्य आहेत, आदरणीय आहेत, वंदनीय आहेत त्यांच्यापुढे माथा झुकवायला आणि त्यांच्या पायावर नतमस्तक व्हायला विसरू नका. ते झुकणं तुमच्या पदरात आशीर्वादाची शिदोरी टाकून जाईल. तुमचा विनय, तुमची नम्रता आदर दाखवून जाईल. त्या कृतीने तुम्ही इतरांच्या प्रशंसेस पात्र ठराल. मात्र लाचारीचं वाकण हे स्वाभिमानात मोडत नाही हे कधीच विसरू नका.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.