भरघोस उत्पादन देणाऱ्या नव्या जातींना प्राधान्य द्या

स्ट्रॉबेरी संशोधक गिलुंग यांचे शेतकऱ्यांना आवाहन : महाबळेश्‍वर तालुक्‍यात अभ्यासदौरा

पाचगणी – स्ट्रॉबेरीला पोषक अशा थंड वातावरणाचा शेतकऱ्यांनी योग्य वापर करीत पारंपरिक रोपांपेक्षा अधिक उत्पादन देणाऱ्या नव्या जातींना प्राधान्य द्यावे. शेतकऱ्यांनी शेतीचे योग्य व्यवस्थापन केल्यास ब्लु बेरी, रेड राजबेरी, ब्लॅक बेरीच्या माध्यमातून स्ट्रॉबेरीला पर्याय निर्माण होऊ शकणार असल्याचे प्रतिपादन कोरियाचे स्ट्रॉबेरी संशोधक पार्क गिलुगं यांनी केले.

पुणे येथील के. एफ. बायोप्लांटच्या माध्यमातून परदेशी स्ट्रॉबेरी संशोधकांचा अभ्यास दौरा नुकताच महाबळेश्‍वर तालुक्‍यातील दांडेघर, खिंगर,भोसे, भिलार, कासवंड येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी पार्क गिलुंग बोलत होते. दक्षिण कोरिया येथील दम्याग अग्रीकल्चर टेकनॉलॉजी सेंटरचे स्ट्रॉबेरी संशोधक चेओल ग्युली, सल्लागार शीम, हॉलंड येथील फ्लिवा बेरीचे संचालक स्टिव्हन ओस्टेरिलू, के. एफ. बायोप्लान्टचे उपाध्यक्ष हेमंत फडतरे, व्यवस्थापक संतोष रांजणे, श्रीकांत पवार, विठ्ठल दुधाने, नीलेश पवार, लक्ष्मण बावळेकर पांडुरंग गोळे, नारायण देवघरे, अजय गोळे, आनंदा बाळकू दुधाने, नितीन भिलारे, तसेच शेतकरी उपस्थित होते.

महाबळेश्‍वर तालुक्‍याचे थंड वातावरण स्ट्रॉबेरीला पोषक असले तरी बदलत्या वातावरणाने घटणाऱ्या उत्पादनाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी पारंपरिक स्वीट चार्ली, विंटर डाऊन, कामारोझा या जातीच्या जोडीला भरघोस उत्पादन देणाऱ्या नव्या दम्यान्ग व झुक्‍यांग या दोन परदेशी जातीचा वापर करावा असे आवाहन स्टिव्हन ओस्टेरिलू यांनी केले. के. एफ. चे उपाध्यक्ष हेमंत फडतरे म्हणाले, स्ट्रॉबेरीच्या नव्या दम्यान्ग व झुक्‍यांग जातीच्या रोपाच्या एका झाडापासून एक ते दीड किलो उत्पादन मिळते तर फळाला गोडवा जास्त असून याचा हंगाम लवकर सुरु होतो. त्यामुळे आगामी काळात या रोपाना तसेच पसंती द्यावी. परदेशी पाहुण्यांनी स्ट्रॉबेरी शेतीची पाहणी केली. संतोष रांजणे यांनी स्वागत केले. श्रीकांत पवार यांनी आभार मानले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.