पहिल्याच पावसात मर्यादा उघड
शिंदे वासुली- चाकण औद्योगिक वसाहतीत नव्याने उदयास आलेली बाजारपेठ म्हणून नावारुपास आलेल्या वासुली फाटा येथील चाकण-शिंदे रस्त्याचे यंदाच्या पहिल्याच पावसात पाण्याचे तळे झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.
शिंदेवासुली, भांबोली परिसरात सोमवारी (दि.11) सुमारे दोन तास अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. गेले कित्येक दिवस चातका प्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकरी वर्गाला अत्यानंद झाला. परिसरातील शेतकरी शेतीच्या पूर्वमशागतीच्या कामाला मुहूर्त मिळाला आहे; परंतु यंदाच्या अवकाळी पावसाने कामगार व व्यापाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली.
वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसाने वासुली फाटा येथील चाकण शिंदे रस्त्यावर नेहमी प्रमाणे पाणी साचले. काहीवेळ बाटल्या वरील रस्त्याचा काही भाग पाण्याखाली गेल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली. येथील रस्त्यालगत दोन्ही बाजूला स्थानिकांनी व्यापारी गाळे बांधून बाजारपेठ तयार केली आहे. बांधकामे रस्त्यापासून दोन तीन फूट उंचीवर असून याठिकाणी पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना वापरून खबरदारी घेतल्याचे दिसून येत नाही. तसेच दुतर्फा बांधकामांमुळे येथील रस्ता सखल झाला आहे. रस्त्यावर पडणारे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याने पाणी रस्त्यावरच साचून राहते. अनेकवेळा रस्ताच हरवून गेलेला दिसतो. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत असते. दुचाकीस्वारांना वाहन चालवणे अत्यंत अवघड होण्याचा अनुभव येथील स्थानिक दरवर्षी पावसाळ्यात घेतात.
हायवे हायब्रीड ऍन्युटी कार्यक्रमांतर्गत चाकण ते भांबोली ते करंजविहीरे रस्त्याच्या रुंदीकरण व नुतनीकरण कामाला सुरुवात झाली असून थोड्याच दिवसात येथील रस्त्याबाबत असलेल्या सगळ्या समस्या सुटल्या जातील असे भांबोलीचे सरपंच सागर निखाडे व वासुलीचे माजी उपसरपंच सुरेश पिंगळे देशमुख यांनी सांगितले.
- अतिक्रमण की प्रशासन जबाबदार?
रस्त्याच्या कडेला बांधकामे करुन गटारे बुजवणाऱ्यांवर सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई करण्याची गरज असल्याचे काही सुज्ज्ञ नागरिकांनी आपले मत व्यक्त केले आहे. वासुली फाटा येथील भांबोलीचे स्थानिक रहिवासी बाळासाहेब राऊत यांनी यासाठी भांबोली ग्रामपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरत आम्ही रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण केले नाही. रस्त्याची गटारे व साचणारे पाणी या समस्या सोडविण्याची जबाबदारी त्यांचीच असल्याचे सांगितले.