पुसेगाव, दि. 2 (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर खटाव तालुक्यातील खातगुण गावात पुसेगाव पोलीस स्टेशन व राखीव पोलिस दलांच्या पथकाने संचलन केले.
यावेळी पुसेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्यासह कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. खातगुण येथे राजेवली बाबांचा ऊरुस सुरू असून यानिमित्त महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून हिंदू व मुस्लीम भाविक या ठिकाणी उपस्थित असतात. त्यामुळे पुसेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने खातगुण येथे जातीय दंगा काबू रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी संपूर्ण खातगुण गावातून संचलन केले. मोहिमेत व संचलनात पुसेगाव पोलीस स्टेशनचे विश्वजीत घोडके यांच्यासह आरसीपी पथकाचे 34 व पुसेगाव पोलीस स्टेशनचे 10 असे एकूण 44 जवान सहभागी झाले होते. गावातील मुख्य रस्त्यावरून दर्गा परिसरापर्यंत संचलन करण्यात आले. लोकसभा निवडणूक शांततेत तसेच निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा देखील तितकीच सज्ज झाल्याचे या संचलनाच्या माध्यमातून मतदारांना दाखवून दिले.