उजनी मृतसाठ्यातून “प्लस’मध्ये

जिल्ह्यांतील धरणांतून विसर्ग; 63 टीएमसी पाणी जमा

भिगवण- पुणे शहरासह मावळात आठवडाभरात दमदार पाऊस पडत असल्याने शहराला पाणी पुरवठा करण्याऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. या चार धरणांपैकी खडकवासला धरण 100 टक्के भरले असून धरणातून 13,980 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला असल्याने हेच पाणी उजनीच्या यशवंतसागर जलाशयाला मिळत असल्याने मंगळवारी (दि.30) उजनीची पाणी पातळी मृतसाठ्यातून प्लसमध्ये आली आहे. आज, उजनी धरणात 63 टीएमसी पाणी जमा झाले असून याच पद्धतीने काही दिवस पुणे शहरासह जिल्ह्यात पावसाची स्थिती कायम राहिल्यास यंदाही उजनी 100 टक्के भरणे शक्‍य होणार आहे.

उजनी धरणात यंदा कधी नव्हे एवढी पाणी पातळी खालावल्याने उजनी पाणलोट क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या शेतीसह जनावरांचाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न बिकट झाला होता. यामुळे उजनीवर अवलंबून असणारी अर्थव्यवस्था बिघडली होती. सध्या, उजनीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत नसला तरी पुणे शहरात पडणाऱ्या पावसामुळे धरण भरण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

पुणे जिल्ह्यातील पावसामुळे खडकवासला, पानशेत, टेमघर, भामा आसखेड, पवना या धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे गेल्यावर्षी उजनी धरण 110 टक्के भरले होते. पुणे जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे गेल्या 27 दिवसांत धरणामध्ये 31 टीएमसी पाणी जमा झाल्याने मंगळवारी दुपारी बारा वाजता धरणाने प्लसकडे वाटचाल सुरु झाली. उजनी हे राज्यातील मोठ्या धरणातील एक धरण असून यात 121 टीएमसी पाणी साठवण्याची क्षमता आहे.

 • उजनी धरणाची स्थिती :
  संध्याकाळी 6:00 वा
  पाणी पातळी : 491.200 दशघमी
  एकूण साठा : 1836.66 दशघमी
  उपयुक्त साठा : +33.85 दशघमी
  टक्केवारी : +2.23%
 • विसर्ग स्थिती
  बंडगार्डन विसर्ग : 34300 क्‍युसेक
  दौंड विसर्ग : 54166 क्‍युसेक
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)