पंचगंगा वाचविण्यासाठी जनजागृतीची गरज- बुधाजीराव मुळीक

कोल्हापूर (प्रतिनिधी) – पाण्यामध्ये 40 प्रकारचे शेवाळ असतात ते प्रदूषणाला प्रतिकार करतात. ही पाण्याची स्वत:ची शुध्दीकरण प्रक्रिया आहे. परंतु प्रदूषणामुळे पंचगंगेतील पाणी मरत आहे. तिला प्रदूषणमुक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज आहे. त्याची सुरुवात स्वत:पासून करा, असे आवाहन पर्यावरण तज्ज्ञ बुधाजीराव मुळीक यांनी केले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या विद्यमाने पंचगंगा नदी व परिसर प्रदूषण निर्मूलनासाठी जनजागृती अभियान येथील शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात घेण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, डॉ. मल्लिनाथ कल्लशेट्टी, अमन मित्तल, पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड, वनसंरक्षक हणमंत धुमाळ आदी उपस्थित होते.

देशातील ज्या प्रमुख 20 नद्या प्रदुषित आहेत त्यामध्ये पंचगंगेचा समावेश आहे, असे सांगून श्री. मुळीक यांनी संगणकीय सादरीकरण केले. पुढे ते म्हणाले, पाण्याला जीवन म्हणतात परंतु पंचगंगेचे पाणी आज मरतय हे लक्षात ठेवा. नदीमध्ये येणारा नायट्रोजन आणि फॉस्फरसचा स्त्रोत बंद केला पाहिजे. नदीच्या पाण्यात पडणाऱ्या राखेमुळे सूर्यप्रकाश येत नाही आणि पाण्यातील सुक्ष्मजीव मरतात.

पूर्वीच्या काळी हिंगणमिट्याने कपडे धुत होतो. मीठाच्या खड्याने दात घासत होतो. सहजच पाटाचं पाणी पित होतो. पण आता असं होत नाही. याचं आत्मपरिक्षण करावं लागेल. दात साफ करणारं फ्लोराईड पोट देखील साफ करतं. शेतकऱ्याने किमान 30 टक्के रासायनिक खतं देणं बंद करायला हवं. पाण्यापासून 30 प्रकारचे रोग होतात. आपणाला दवाखाना चालवायचा का? हे ठरवावं लागेल. पंचगंगा नदी कायम प्रवाही नसून ती हंगामी प्रवाही आहे. तीच्यावर आठ बंधारे आहेत तीला प्रदूषण मुक्त करण्यासाठी स्वत:पासून सुरुवात करा. विशेषत: विद्यार्थ्यांचे प्रबोधन करुन त्यांना जनजागृती दूत बनवा. या मोठ्या चळवळीत प्रत्येकाने सहभागी व्हा,असेही मुळीक म्हणाले.

पर्यावरण तज्ज्ञ गायकवाड यांनीही संगणकीय सादरीकरण करुन पंचगंगा प्रदूषण मुक्त करण्यासाठी विविध माहिती दिली आणि पंचगंगा पदूषणमुक्तीसाठी आवाहन केले. 19 जुलै रोजीच्या शासन निर्णयाचे अनुपालन केल्यास ग्रामपंचायती स्वच्छ होतील. त्याचबरोबर प्रदूषण रोखण्यास मदत होईल असे मित्तल यांनी सांगितले. देसाई यांनी प्रदूषणास कारणीभूत असणाऱ्या घटकांचा सविस्तर आढावा सांगितला. महानगरपालिका, नगरपालिका, औद्योगिक वसाहती या सर्वांचा प्रदूषणामध्ये असणारा हिस्सा आणि त्यावरील ठोस उपाययोजना करण्यासाठी कृती आराखडा तयार करा. जनमाणसात प्रदूषण कमी करण्यासाठी जनभावना निर्माण व्हायला हवी. त्यासाठी प्रत्येकाने स्वत:पासून सुरुवात करावी, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. कल्लशेट्टी यावेळी म्हणाले, रि-ड्यूस, रि- युज, रि-सायकल यांच्या जोडीला रि-फ्युज करायला हवे. प्रदूषण होणार असेल, तर अशा गोष्टींना नाही म्हणायला शिकलं पाहिजे. ट्रिटमेंट केलेलं पाणी आपण वाया घालवतो त्यामुळे मागितल्याशिवाय येणाऱ्यांना पाणी द्यायचं नाही. प्रत्येक गावाने पर्यावरण विकास आराखडा बनवावा. विद्यार्थ्यांना स्वच्छता दूत म्हणून जनजागृती चळवळ वाढवावी लागेल. जिथे जिथे शक्य आहे तेथे पर्यावरण पुरक वस्तुंचा वापर करा.
उप प्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी जिल्हा पर्यावरण समितीचे सदस्य, विविध अधिकारी, पदाधिकारी आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.