आरोप- प्रत्यारोपाची पातळी ओलांडली

शिरूरच्या आखाड्यात सोशल मीडिया चर्चेत

रांजणगाव गणपती- लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने सध्या सोशल मीडियावर कार्यकर्ते आपल्या नेत्याचे गुणगान गात आहेत. त्याचबरोबर समोरच्या नेत्याचेही अगदी खालच्या पातळीवर जाऊन वाभाडे काढले जात आहे. त्यामुळे लोकसभेच्या आखाड्यात सत्ताधारी आणि विरोधकांनी वैचारिक पातळी ओलांडली आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील पंडितांचे कारनामे सर्वसामान्यांना बुचकाळ्यात टाकत आहेत.

राजकीय नेत्यांची हुजरेगिरी करण्याच्या नादात काय करत आहोत किंवा आपण काही काम करत आहोत, याचे भान सध्याच्या पिढीला राहिलेले नाही. उचलली जीभ लावली टाळ्याला या उक्‍तीप्रमाणे हातात असलेल्या सोशल मीडियाच्या लिखाणाचा अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याचा गैरवापर होत असल्याचे दिसत आहे. यावर निवडणूक आयोगाचे बंधन आहे. मात्र, निवडणूक आयोगाकडे याकडे लक्ष देण्यासाठी आवश्‍यक, असे मनुष्यबळ नसल्याने सोशल मीडियावरील टिकाटिप्पणी समाजासाठी घातक ठरणार आहे.

राजकीय नेत्यांना मी किती जवळचा आहे. मी किती एकनिष्ठ आहे, हे दाखवण्यासाठी कार्यकर्ते समोरच्या उमेदवाराचे अक्षर चीरहरण, वस्त्रहरण करीत आहेत. मात्र, आपल्या परस्पर समोरच्याचे खच्चीकरण होत असल्याने त्याची बदनामी होत असल्याने राजकीय नेते खूष होत आहेत. अशा कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत आहेत, यातील बरेचसे कार्यकर्ते हे बिनपगारी फुल्ल अधिकारी असतात. निवडणुकीच्या तोंडावर ती पदांची खिरापत वाटून त्यांना कामाला लावलेली असते.
स्थानिक राजकीय नेत्यांनी कार्यकर्त्यांना मोठेपणा दिलेला असतो. त्यामुळे हे उत्साही कार्यकर्ते ओरडून आपल्या नेत्याचे गुणगान गात असतात. मात्र, हे गुणगाण गात असताना ते आपल्या जवळचा मित्र, नातेवाईक यांच्यावर आगपाखड करत असतात, हे कार्यकर्त्यांना समजत नाही. परिणामी कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे गावागावांमध्ये गट निर्माण होऊन गावच्या विकासाला खीळ बसत आहे.

  • गड्या आपलं गाव बरं…
    गटातटाच्या राजकारणामुळे गावात वाद निर्माण वाढत आहेत. कधी ग्रामपंचायतीच तोंडही न पाहिलेले किंवा प्रशासकीय कामाचा अनुभव नसलेले उत्साही कार्यकर्ते किंगमेकर म्हणत आहेत. युवा नेते, भावी सरपंच अशा स्वरूपाचे फलक लावून गावागावांमध्ये बॅनरबाजी केली जात आहे. नाहक पैशाची व वेळेचा अपव्यय केला जात असल्याचे चित्र गावागावात पाहायला मिळत आहे. त्यातूनच वादावादीचे प्रकार वाढत आहे. गावागावातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालली आहे. जुन्या व नव्या राजकीय विचारसरणीमध्ये फरक पडत चालल्याने गाव गाडा हाकणे जुन्या नेत्यांना मुश्‍कील झाले आहे. घरातलं पोरगं ऐकत नाही तर गावाला काय शहाणपणा शिकवू, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिक, नेते व्यक्‍त करीत आहेत. कधीकाळी बिनविरोध होत असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये आज दोन ते तीन गट एकमेकांच्या समोरासमोर उभे ठाकत आहेत. लाखो, करोडोंचा खर्च केला जात आहे. मात्र गावात विकासाच्या नावाने बोंबाबोंब केली जात आहे. आजही बहुतांश गावांमध्ये निधी वापराविना पडून आहे. कारण केवळ राजकीय स्वार्थासाठी पाच वर्षात पाच सरपंच उपसरपंच असा पदाचा खेळत मांडला जात आहे. त्यामुळे विकासाची प्रतीक्षा करीत असलेल्या गावकऱ्यांना “जुनं ते सोनं’ अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.