अवकाळी पावसाचा कांदा उत्पादकांना फटका

जुन्नर तालुक्‍याच्या पूर्व भागात शेतकरी चिंतेत

बेल्हे- तालुक्‍याच्या पूर्व भागात सोमवारपासून अवकाळी पावसाचे वातावरण होत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.
ढगांचा कडकडाट, वादळी वारे, काळेकुट्ट ढग, पावसाचा पडणारा जेमतेम शिडकावा, एकीकडे कडक उन्हाळा, त्यातच पाणी टंचाईचे संकट आणि आता अवकाळीचे अस्मानी संकट अशा सर्वच बाजूंनी शेतकरी संकटात सापडला असून, उपलब्ध पाण्यावर घेतलेला आणि काढणी केलेला कांदा, पडलेले बाजारभाव आणि अवकाळी पावसाचा धसका घेत दगडी चाळीत साठविण्याचे युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहावयास मिळत आहे.

जुन्नरचा पूर्व भाग हा कांदा पिकाचे आगर समजले जाते. बाजारभाव असल्यास हमखास पैसे मिळवून देणारे पीक म्हणून कांदा पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. बांगरवाडी येथील शेतकरी वसंतराव कदम यांनी आपल्या जेमतेम जमिनीत कांदा पीक घेतले आहे. अहोरात्र काबाडकष्ट करून हाताशी आलेला कांदा चार पैसे होतील या आशेने व अवकाळीच्या तडाख्यात सापडू नये म्हणून कदम कुटुंब भल्या पहाटेपासूनच कांदा दगडी चाळीत भरण्याचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

हीच परिस्थिती तालुक्‍याच्या पूर्व भागात आणे, पेमदरा, नळावणे, शिंदेवाडी, बेल्हे, गुंजाळवाडी, राजुरी, बोरी-बुद्रुक व इतरही गावांत असून अवकाळी पावसाच्या धसक्‍याने शेतकऱ्यांची आहे ती पिके वाचविण्याची धावपळ पाहावयास मिळत असून, शेतकरी मात्र सर्वच बाजूंनी संकटात सापडला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.