विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा : फेडरर व नदाल आमनेसामने

विम्बल्डन – ग्रासकोर्टवरील सम्राट म्हणून ख्यातनाम असलेल्या रॉजर फेडरर याला विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धेतील उपांत्य फेरीत पारंपरिक प्रतिस्पर्धी राफेल नदाल याच्याशी दोन हात करावे लागणार आहे. उपांत्य फेरीच्या अन्य सामन्यात गतविजेता नोवाक जोकोविच याच्यापुढे रॉबर्ट बॅटिस्टा ऍग्यूट याचे आव्हान असणार आहे. या दोन्ही लढतींबाबत कमालीची उत्कंठा निर्माण झाली आहे.

माजी विजेत्या फेडरर याने जपानच्या केई निशिकोरी याचे आव्हान 4-6, 6-1, 6-4, 6-4 असे संपुष्टात आणले. तृतीय मानांकित नदालने अमेरिकन खेळाडू सॅम क्‍युएरी याची अनपेक्षित विजयाची मालिका 7-5, 6-2, 6-2 अशी खंडित केली. अग्रमानांकित जोकोविच याने बेल्जियमच्या डेव्हिड गॉफीन याचा 6-4, 6-0, 6-2 असा पराभव केला. 23 वा मानांकित खेळाडू ऍग्यूटने अर्जेंटिनाच्या गुईदो पेला याची आश्‍चर्यजनक विजयाची परंपरा 7-5, 6-4, 3-6, 6-3 अशी रोखली. त्याने पासिंग शॉट्‌सचा बहारदार खेळ केला.

फेडरर याच्याविरूद्ध निशिकोरीने पहिला सेट घेत उत्कंठा निर्माण केली होती. या सेटमध्ये त्याने पासिंग शॉट्‌सचा बहारदार खेळ केला. मात्र, दुसऱ्या सेटपासून फेडररला सूर गवसला. त्याने उर्वरित तीनही सेट्‌समध्ये फोरहॅंडच्या ताकदवान फटक्‍यांचा सुरेख खेळ केला. तसेच त्याने बिनतोड सर्व्हिस करीत निशिकोरीला फारशी संधी दिली नाही.

नदालविरुद्धच्या लढतीबाबत फेडरर म्हणाला की, फ्रेंच स्पर्धेत मला जरी त्याच्याकडून पराभव स्वीकारावा लागला असला तरी हा पराभव इतिहासजमा झाला आहे. ग्रासकोर्ट माझ्यासाठी नेहमीच अनुकुल ठरले आहे. तरीही मी नदालला महान प्रतिस्पर्धी मानूनच खेळणार आहे. त्याच्याविरूद्ध मला येथे खेळावे लागणार आहे याची मला कल्पना असल्यामुळे मी चांगली तयारी केली आहे. सुदैवाने येथे आतापर्यंत मला फारसा संघर्ष करावा लागलेला नाही. त्याचा फायदा मला उपान्त्य लढतीसाठी होणार आहे.

नदाल म्हणाला की, माझ्यावर कोणतेही दडपण नाही. फ्रेंच स्पर्धेत मी त्याला सरळ तीन सेट्‌समध्ये पराभूत केले आहे. त्यामुळे माझे मनोधैर्य उंचावले आहे. त्याचा फायदा घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ग्रासकोर्टवर तो नेहमीच अव्वल खेळ करीत असला तरीही मी येथे विजेतेपद मिळविले आहे. त्यामुळे मी देखील ग्रासकोर्टवर चांगली कामगिरी करू शकतो.
जोकोविचने सांगितले की, सरळ तीन सेट्‌समध्ये विजय मिळविल्यामुळे माझा उत्साह वाढला आहे. सध्या येथे माझा खेळ मनासारखा होत आहे. तरीही ऍग्यूट हा तुल्यबळ खेळाडू आहे. त्यामुळे त्याच्याविरूद्ध मी गाफील राहणार नाही. शेवटपर्यंत सर्वोत्तम कौशल्य दाखविण्यावर मी भर देणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)