आता आपणच व्हावं पाऊस…

File Photo

रे पावसा,
खूप दिवसांपासून सांगायचं होतं तुलाच, तुझ्याविषयी. तशी तुझी-माझी दोस्ती जुनीच- खोटा पैसा देण्यापासूनची! पण तरिही तू तो पैसा कधी घेतला नाहीस आणि यायचाही थांबला नाहीस. शाळेला जाताना किंवा शाळेतून सुटताना तू नेमका आलास की वाटयचं, “तुझीही शाळा असावी कुठेतरी, आणि तीही माझ्याच शाळेच्या वेळात भरत-सुटत असावी.”

पुढे धुंद वर्षांमध्ये तुझी अनेक रुपं पहायला मिळाली. ओढ लावणारा, कधी एकटं करणारा, कधी सोबत करणारा, चिरविरहिणी धरतीला आपल्या वर्षावाने खुलविणारा तू! तू आलास की हिरवी दृष्टी, हिरवी सृष्टी, समृद्ध दुनिया, रंग नसलेल्या तुझ्या पाण्याने हिरवी किमया साधणारा तू. कुणासाठी धुंद रोमॅण्टीक तर कुणासाठी नुसती चिकचिक्‌! पण त्याची पर्वा तुला कशाला?

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आता? आता असं वाटतं की, तू पण ऑफिसला जात असावास आणि तुझ्या-माझ्या ऑफिसची भरण्या-सुटण्याची वेळ पण तीच आहे. पण आता मला दिसू शकतं, तुझं पालकपण! जगरहाटीसाठी, जगण्यासाठी सर्वात जास्त जीवनदायी कोण असेल, तर तो तूच! पण तरिही सगळ्यांची बोलणी खातोस. कधी ऐनवेळी, नको त्या वेळी आलास म्हणून, तर कधी वेळेवर, पुरेसा आला नाहीस म्हणूनही!

पण तू येतोस. जगाला फुलवतोस; लेकरे टाकून बोलली तरी त्यांच्या खस्ता काढणाऱ्या समजूतदार आई-बाबांसारखं.
मला तुझं सगळ्यात काय आवडतं सांगू?
कधी रिमझिमतोस,
कधी रिपरिपतोस,
कधी मुसळधार, तर
अंग ओलंही करत नाहीस,
कधी कणभर कोरडंही ठेवत नाहीस,
असं तुझं वागणं.

कोणी काहीही म्हणू दे, चिडचिडू दे, शिव्या देऊ दे; तू मात्र तुला हवा तेव्हाच, हवा तस्साच येतोस आणि वसुंधरेला फुलवण्याची जबाबदारी चोख पार पाडतोस. तुला दिलेलं, तू पत्करलेलं काम अचूक पार पाडतोस.

म्हणूनच अलीकडे मला वाटतं की, तुझ्यासारखं नीतळ, पारदर्शी आणि निष्काम व्हावं. पुष्कळ पाहिली माणसं आणि माणुसकी. आता मात्र व्हावं म्हणते पाऊस आणि पाळावी म्हणते पाऊसकी!

– आभा अभ्यंकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)