रस्त्यावर सहज फिरताना…

तुम्हाला पायी फिरण्याची आवड आहे का? म्हणजे काही कामासाठी दुकानात, बाजी मार्केटला वगैरे जाणे वेगळे, पण तुमच्या शहरात नुसताच एखाद्या रस्त्यावरून पायी फेरफटका तुम्ही कधी मारला आहे का? मारता का? जर तसा फेरफटका मारत नसाल, तर सहज कधी असा नुसता पायी फेरफटका मारून बघा. असे सहज रमत गमत चालता चालता बरेच काही दृष्टीस पडते.

शहराच्या बस स्टॅन्डजवळ, मोक्‍याच्या जागी एखादी “माणुसकीची भिंत” तयार केलेली दिसते. केवळ एक साधीशी भिंत. तिथे वेगवेगळी चित्रं काढलेली असतात. सामानाची माहिती किंवा काही सूचना दिलेल्या असतात. दोन चार खिळे ठोकलेले असतात. तुमच्या घरातल्या नकोश्‍या वस्तू तुम्ही इथे आणून टाकायच्या. जास्तीचे, नको असलेले कपडे तिथे ठेवायचे. स्त्रियांचे कपडे वेगळे, पुरुषांचे वेगळे, मुलामुलींचे वेगळे…. असेही बोर्डस्‌ असतात. घरातलं नको असलेलं फर्निचर देखील काही शहरांत असं माणुसकीच्या भिंतीपाशी ठेवता येतं. गरजू लोक ते घेऊन जातात आणि वापरतात. कुठे एखादे लहानसे कपाट सार्वजनिक जागी खुले ठेवलेले असते. तिथे तुमच्या घरातली नको असलेली पुस्तकं नेऊन ठेवता येतात. हवी तितकी आणि विनामूल्य. त्या जागी इतर लोकांनी आणून ठेवलेली पुस्तकं पण असतात. त्यातले एखादे तुम्हांला आवडले, तर तुम्हालासुद्धा ते घेऊन जाता येते. तुमची पुस्तकं, मासिकं दुसरे वापरू शकतात. पुन्हा तिथे आणून ठेवू शकतात. काही मोक्‍याच्या जागी आजकाल प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या वेगळ्या करून जमा करायची सोय केलेली दिसते. तशी यंत्रे तिथे लावलेली असतात. कुठे कुठे अशा यंत्रांच्या समोर उभं राहून सेल्फी घेऊन त्यांना पाठवायची स्पर्धा देखील सुरू असते. कचऱ्याचे वर्गीकरण करायचा एक मार्ग अशा प्रोत्साहनपर गोष्टींमधून ते शिकवत असतात.

ओपन जिम हा प्रकार आजकाल जागोजागी दिसतो. तुम्ही चोवीस तासांत केव्हाही तिथे जाऊन व्यायाम प्रकार करू शकता. ते ही विनामूल्य असतात. हाताचे, पायाचे, कमरेचे असे वेगवेगळे व्यायाम प्रकार तुम्ही फिरता फिरता करू शकता. ह्या सुविधेचा लाभ घेणाऱ्या लोकांमध्ये स्त्रियासुद्धा मोठ्या संख्येने रस्त्यांवर दिसू लागल्या आहेत. लहान मुलं, ज्येष्ठ नागरिकदेखील वरचेवर अशा ओपन जिमला भेट देतात. रस्त्यावची ही मॉडेल्स नीट राखणे आपल्याच हातात असते. त्यांचा वापर आपण नीट करू शकतो. डोळस नागरिक म्हणून इतरांवर देखील थोडं लक्ष ठेवू शकतो, जेणेकरून ही मॉडेल्स चोरीला जाणे, मातीतून उखडली जाणे, तुटणे यांचे प्रमाण कमी होईल. तीच गोष्ट रस्त्यावरच्या वाचनालयाचीे. अशी वाचनालयेसुद्धा शहरात जागोजागी दिसतात आणि ती विनामूल्य असतात. वेगवेगळी वृत्तपत्रं, मासिकं तिथे ठेवलेली असतात. आपण केव्हाही जाऊन तिथे वाचन करत बसू शकतो. आपलं वाचून झाल्यावर ते ते वर्तमान पत्रं त्याच्या खाचेत नीट ठेवू शकतो. सहजच फिरता फिरता असे काही रस्त्यावरचे छोटे उपक्रम आपण समजून घेऊ शकतो. त्यांचा वापर करून बघू शकतो.

– प्राची पाठक

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)